कोविड केअर सेंटरचे ऑनलाइन उद्‌घाटन

माणदेशी बॅंकेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांवर योग्य उपचार होतील : नीलम गोऱ्हे

गोंदवले (प्रतिनिधी)- गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात माणदेशी बॅंकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे ऑनलाइन उद्‌घाटन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते बुधवारी झाले तर फित कापून औपचारिक उद्‌घाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. या सेंटरमुळे ग्रामीण भागातील करोनाबाधितांवर योग्य उपचार होतील, असा विश्‍वास गोऱ्हे यांनी व्यक्‍त केला.

माणदेशी बॅंकेच्या अध्यक्ष चेतना सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, प्रभात सिन्हा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी,अलोका मुजुमदार उपस्थित होत्या. गोऱ्हे म्हणाल्या, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांमुळे गोंदवले बुद्रुक प्रसिद्ध आहे. तर आरोग्यासाठी गोंदवले खुर्द प्रसिद्ध होईल. या सेंटरला रुग्णवाहिकेसाठी आमदार फंडातून 12 लाख रुपये देणार आहे. कोविडमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. करोनाविरोधातील युद्धात मास्क हे शस्त्र आहे. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानामुळे रुग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली आहे.

“आमच्या गावात आमचे सरकार’ याप्रमाणे या सेंटरचा वापर होईल. करोनाचा काळ मानवतेला आव्हान देणारा आहे. शेखर सिंह म्हणाले, माणदेशीने सुरुवातीपासून जिल्हा प्रशासनाला मदत केली आहे. जिल्हा कोविड जम्बो हॉस्पिटलसाठीहील मोलाची मदत केली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज वाटली नव्हती; परंतु डॉक्‍टरांपासून नर्सेसपर्यंत सर्वांनी कष्टाने हे सेंटर उभारले आहे. रुग्णांवरील उपचारांसाठी डॉक्‍टर, नर्सेस व वॉर्ड बॉयनी कंबर कसली पाहिजे. प्रभात सिन्हा म्हणाले, करोनाच्या संकटात माणदेशी बॅंकेने जिल्ह्यात अनेक ठिकाणी मदतीचा प्रयत्न केला आहे.

भविष्याचा विचार करून गोंदवल्यात कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविण्याची गरज आहे. चेतना सिन्हा, अलोका मुजुमदार यांची भाषणे झाली. डॉ. अमित पाटील हे रोज एक तास या सेंटरसाठी देणार आहेत. त्याबद्दल त्यांचा आणि दरम्यान, गोंदवले खुर्दचे माजी सरपंच अजित पोळ व ग्रामसेवक शरद जाधव यांचा सत्कार करण्यात आला. गोंदवलेकरांच्यावतीने प्रभात सिन्हा यांचाही सत्कार करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.