पुणे – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने शाळांना दिवाळीची “ऑनलाइन सुट्टी’ जाहीर झाली आहे. दि.12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीची अशी सुट्टी देण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाकडून गुरूवारी परिपत्रक जाहीर करण्यात आले.
करोनामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे शाळांना दिवाळीची सुट्टी मिळणार की नाही, असा प्रश्न विद्यार्थी व शिक्षकांसमोर होता.
शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर होणार असल्याची घोषणा नुकतीच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. त्यानुसार शासनाकडून गुरूवारी त्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असे राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले. सुट्टीच्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांची कुठलीही परीक्षा घेऊ नये, असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले.