पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्याहून अधिक काळापासून बंद असलेले महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे (महारेरा) सुनावणी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुरू झाली आहे. सुनावणी पूर्णपणे ऑनलाईन, डिजिटल आणि कागदाच्या वापराशिवाय होणार आहे. याबाबत महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सुनावणीने लांबल्याने चिंताग्रस्त झालेल्या बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान अपिलेट ट्रिब्युनल सोमवारपासून (दि.8) सुरू झाले आहे.
गेल्या काही महिन्यापासून जगभरामध्ये करोनाने धुमाकूळ घातला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरुवातीला 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र, करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला. त्यानंतर 17 मेपर्यंत, त्यानंतर 31 मेपर्यंत वाढविण्यात आला. आता 30 जूनपर्यंत पाचवा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.
या काळात कार्यालयात होणारी गर्दी टाळून करोनाचा प्रादुर्भाव रोखणयासाठी महारेराचे बंद करण्यात आले होते. मात्र, आता सुधारित आदेश काढून ते ऑनलाईन सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प नोंदणी, एजंट नोंदणी, विस्तार दुरुस्ती कार्याच्या सुविधा पूर्वीपासून ऑनलाईन सुरू आहेत.