करोनावर उपाय शोधण्यासाठी ऑनलाइन हॅकेथॉन

पुणे -जगभर हाहाकार माजवणाऱ्या करोना विषाणूवर उपाययोजना करण्यासाठी ऑनलाइन हॅकेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशनच्या (फिक्‍की फ्लो) पुणे चॅप्टर आणि केंद्रीय इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्रायलाच्या वतीने या हॅकेथॉनचे आयोजन केले आहे.

महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, भारत सरकारचे स्टार्टअप हब, कौशल्य व उद्योग मंत्रालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स ऍन्ड टेक्‍नोलॉजी पार्क, एपीजे अब्दुल कलाम सेंटर, रोबोटेक्‍स इंटरनॅशनल, गॅरेज, एक्‍सेलरेट इंडिया आदी संस्थांनी या हॅकेथॉनला सहयोग दिला आहे, अशी माहिती हॅकेथॉनच्या मुख्य संयोजक आणि फिक्‍की फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा रितू प्रकाश छाब्रिया यांनी दिली.

आजघडीला करोनावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. त्यामुळे या करोनाच्या संकटाचा सामना करण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी ही ऑनलाइन हॅकेथॉन आयोजिली आहे. याद्वारे लोकांकडून विविध कल्पना मागविण्यात येणार आहेत. यामध्ये व्यक्‍तिगत किंवा सांघिक स्वरुपात सहभागी होता येईल. करोनामुळे परिणाम होणाऱ्या अवैद्यकीय अडचणींवरही उपाय शोधण्यासाठी स्पर्धकांना प्रोत्साहित केले जाणार आहे. 25 मार्च रात्री 12 पर्यंत आपण आपली कल्पना सादर करू शकणार आहेत, असे आवाहन रितू छाब्रिया यांनी केले आहे.

पहिल्या तीन कल्पनांना एक लाखांपर्यंतची रोख पारितोषिके दिली जाणार असून, यातील निवडक 300 कल्पनांना भारतीय तज्ज्ञ आणि युरोपियन (ईयू) पॅनल प्रत्येक पायरीवर ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. 27 ते 29 मार्च या कालावधीत सलग 48 तास ही हॅकेथॉन सुरू राहणार आहे, असे छाब्रिया यांनी नमूद केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.