ऑनलाइन गेमिंग आणि यंगस्टर्स

काळाच्या प्रवाहानुसार व्यक्ती अनेक गोष्टी आत्मसात करत असतो. आजूबाजूला घडणारे बदल तरुण पिढी त्वरित आत्मसात करत असते. नियमानुसार तरुण पिढीही अनेक नवनवीन शिकत असते. सध्या तरुणांमध्ये ऑनलाइन गेम्सचे गारूड दिसू लागले आहे. तरुण मोठ्या प्रमाणात गेमिंगच्या दुनियेत जगताना दिसत आहेत. सध्या पब्जी आणि फ्री फायर या ऑनलाइन गेम्सची चलती आहे. निव्वळ भारतातच नव्हे तर जगभर सर्वत्र लोकप्रिय असणाऱ्या ऑनलाइन खेळातील पब्जी सध्या तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. पब्जीबरोबरच फ्री फायर गेमची तरुणांमध्ये उत्सुकता आहे.

सतत आपल्या मित्राला ए ऑनलाइन येतो का? असे विचारले जाते. हे नेमके कशासाठी तर खेळण्यासाठी मित्रांना ऑनलाइन बोलावले जाते. ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीत आणि इंटरनेटची जोडणी घेऊन आपल्या मोबाइलवर खेळला जाणारा एक खेळ. ज्यात आपल्यासोबत अनेक लोक समाविष्ट करून घेता येतात. यात खेळाडूंचा एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क होतो. आपल्या खेळात समाविष्ट असणारे खेळाडू आपल्या मित्रमंडळींपैकीच असतील असे नाही. जगभरातील कोणत्याही खेळाडूला आपण आपल्या खेळात समाविष्ट करून घेऊ शकतो. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे पब्जीसारख्या खेळात आपले फेसबुकमधील मित्रमंडळी आपल्याला आपोआप मोबाइल स्क्रीनवर दिसतात. ज्यामुळे आपण त्यांना आपल्या खेळात समाविष्ट करून घेऊ शकतो.

बहुतेकदा या ऑनलाइन खेळांमध्ये असे अनेक खेळाडू असतात, जे एकमेकांना व्यक्तिश: ओळखत नसतात. मात्र या ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून त्यांची ओळख होते. कोणत्याही प्रकारे संपर्क क्रमांक एकमेकांना दिला जात नसला तरी एकमेकांशी संवाद साधता येतो. फक्त खेळासाठीचा हा बंध असतो. या खेळात खेळाडू एकमेकांसोबत संवाद साधत असतात आणि एकमेकांच्या साहाय्याने खेळात मदत करत असतात. या ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून मैत्री वाढते आहे आणि या मैत्री समूहाला पब्जीप्रेमी असे नाव देण्यात येत आहे. पब्जीप्रेमींशी बोलणे झाले असता आणखी काही गोष्टी समोर आल्या. इतर काही गेम्सच्या तुलनेत पब्जीचे ग्राफिक्‍स अनोखे आणि उत्तम आहेत जे खेळाडूंना आकर्षित करतात.

कोणत्याही गोष्टीत अति तिथे माती असते. या संदर्भात माइंड गुरू डॉ. राजेंद्र बर्वे सांगतात, मुलांची बिघडणारी मानसिकता आणि ढासळत्या आरोग्याला ऑनलाइन गेम कारणीभूत ठरतात. या गेममुळे मुलांचा हट्टीपणा वाढत चालला आहे. सतत एकाच ठिकाणी मोबाइल हातात घेऊन बसण्याने मुलांमध्ये स्थूलता आणि लठ्ठपणा वाढत चालला आहे. बौद्धिक क्षमतेवर परिणाम होत असल्याने मुलांच्या हालचालींवर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे. असा त्रास भेडसाविणाऱ्या मुलांना डॉक्‍टरांकडे घेऊन येणाऱ्या पालकांची संख्या वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही घातक बाब आहे. पालकांना कळकळीची विनंती आहे कि आपल्या मुलांना वेळीच सावध करा.

– भगवान गावित

Leave A Reply

Your email address will not be published.