नव्या-नव्या रेसिपीज्चा नागरिक घेताहेत आस्वाद
पिंपरी – लॉकडाऊनमुळे सध्या घरातच थांबावे लागत असल्याने नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांची प्रत्यक्ष भेट घेणे शक्य नाही. त्यामुळे आता ऑनलाइन खेळ रंगू लागले आहेत. त्याशिवाय, घरोघरी नव्या-नव्या रेसिपीज बनविल्या जात आहेत. “यू-ट्यूब’वर अशा रेसिपीज शोधून त्या बनविण्यात महिला वर्ग व्यस्त आहे. तर, पुरूष मंडळी देखील त्यासाठी हातभार लावताना दिसत आहेत.
करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती वगळता अन्य लोकांना घरातच थांबण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. घरात बसून क्षणभर विरंगुळा मिळावा म्हणून आता ऑनलाइन खेळ रंगू लागले आहेत. व्हॉट्सअपवर सुमारे तास ते दीड तास हे खेळ रंगत आहेत. तंबोला, हाऊजी, बॉलिवूड, अंताक्षरी आदी ऑनलाइन खेळांचा त्यामध्ये समावेश आहे.
रेसिपीज्ची चलती
लॉकडाऊनमुळे सगळे कुटुंबच घरी असल्याने पुरूष वर्गाकडून नवे-नवे खाद्यपदार्थ बनविण्यासाठी गृहिणींकडे आग्रह केला जात आहे. यू-ट्यूबवर नव्या-नव्या रेसिपीज पाहून ते बनविण्यावर गृहिणी वर्गाचा भर आहे. कमी साहित्यात बनविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांना प्रामुख्याने पहिली पसंती मिळत आहे. बिस्कीट, रवा, मैदा आदींचा वापर करून बनविण्यात येणारे केक, चायनीज पदार्थ, पंजाबी डिशेस, पंजाबी व्हेजीटेबल आदी वेगवेगळ्या रेसिपीज बनविल्या जात आहेत. रव्याचे गुलाबजामून, कुल्फी, पनीर, चीज, बुंदी, बालुशाही असे पदार्थ घरच्या घरी बनवून खवय्यांची भूक भागविली जात आहे.