करोना लसीनंतर सायबर गुन्हेगारही सक्रिय; अनोळखी लिंक ओपन न करण्याचे पोलिसांचे आवाहन
पिंपरी – करोना लसीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या जनतेला आता सायबर गुन्हेगारांनी लक्ष केले आहे. लसीकरणाच्या नोंदणीसाठी फोन, मेसेज, ई-मेल करून ऍप डाऊनलोड करण्यास सांगून किंवा लिंक पाठवून अनेकांना जाळ्यात ओढत आहेत. लिंकवर क्लिक केल्यानंतर फॉर्म भरण्यास सांगितल्या जात आहे. त्यामध्ये व्यक्तीचे पॅनकार्ड, आधारकार्ड आणि बॅंकेची माहिती भरण्यास सांगण्यात येत आहे. माहिती भरल्यानंतर आपले बॅंक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे. यामुळे अशा लिंकवर क्लिक करून कोणतीही माहिती देऊ नका, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाने केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात लसीकरणाची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरू आहे. सामान्य नागरिकांसाठी अद्याप लसीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मात्र, सायबर गुन्हेगारांनी ही बाब हेरून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्याच्या नावावर अनेकांना मोबाइलवर किंवा इ-मेलद्वारे लिंक पाठवणे सुरू केले आहे. नोंदणी केलेल्यांनाच करोना लस देण्यात येईल, अशी अफवा देखील सायबर गुन्हेगारांनी पसरवली आहे.
लिंकवर क्लिक करताच एक फार्म भरण्यास सांगण्यात येते. त्यामध्ये व्यक्तीचे पॅन कार्ड, आधारकार्ड आणि बॅंकेची डिटेल्स भरण्याच्या सूचना दिल्या जातात. हा फार्म भरल्यानंतर सायबर गुन्हेगार माहिती भरणाऱ्या व्यक्तीचे बॅंकेचे खाते रिकामे करतात. अशाप्रकारे सायबर गुन्हेगारांनी नव्याने फंडा तयार केला असून अनेकांना गंडा घालणे सुरू केले आहे. पिंपरी चिंचवड शहरात असा प्रकार घडला नसला तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलीस करीत आहेत.
– करोना लसीकरण नोंदणीच्या नावाने फसवणूक होण्याची शक्यता.
– करोना लसीबाबत शासनाने कोणतीही लिंक जाहीर केलेली नाही.
– अनोळखी लिंकवर क्लिक करून बॅंकेबाबतची कोणतीही माहिती देऊ नये.
– आपल्याला आलेली लिंक खात्री केल्याशिवाय इतरांना पाठवू नये.
करोना लसीकरणासाठी सध्या कोणतीही नोंदणीसुद्धा सुरू नाही. करोना लस नोंदणीसाठी खासगी मोबाईल फोन मेसेज / व्हॉट्स ऍप वरून शासनाकडून लिंक देण्यात आलेली नाही. त्यामुळे कुणीही आलेल्या लिंकवर क्लिक करू नये. तसेच करोना लसीकरणासाठी कोणताही ऑनलाइन फार्म ज्यामध्ये बॅंकेशी संबंधित माहिती भरू नये. मॅसेजमध्ये येणारी लिंक फसवी असू शकते. खात्री केल्याशिवाय कोणत्याही मॅसेजला कोणताही प्रतिसाद देऊ नका.
– प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा.