सर्व्हर डाउनमुळे मिळेनात ऑनलाइन उतारे

विनोद पोळ
‘भूलेख’ बंद पडल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची गैरसोय

कवठे  – गेल्या काही वर्षांत महसूल विभागाचा कारभार हा ऑनलाइन झाला आहे. त्यामुळे नागरिकांना लागणारे सातबारा उतारे व आठ अ चे उतारे हे महसूल विभागाच्या भूलेख या वेबसाइटवर सहजासहजी मिळत आहेत. मात्र गत तीन दिवसांपासून ही वेबसाइट बंद पडल्याने नागरिकांनची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

महसूल विभागातील सर्वच महत्त्वाच्या कामासाठी गरज असते ती सातबारा उतारा व आठ अ उताऱ्याची. हे दोन्ही उतारे आता ऑनलाइन पद्धतीने भूलेख या वेबसाइटवर सहज उपलब्ध होत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय होत होती. संपूर्ण महाराष्ट्राचा संगणीकृत सातबारा या साइटवर दिसत असल्याने व तो सहज प्राप्त होत असल्याने नागरिकांना तलाठी कार्यालयात न जाता संगणकावर व मोबाइलवर तात्पुरत्या स्वरुपात उतारा पहावयास मिळत होता. परंतु या आठवड्यात 24 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत 1 ते 4 या वेळेत ही वेबसाइट पूर्णत: बंद राहत होती.

परंतु इतर वेळी ही वेबसाइट सुरु राहत असल्याने थोड्या प्रमाणात गैरसोय होत असली तरी इतर वेळी सातबारा व खाते उतारा उपलब्ध होत असल्याने थोड्या प्रमाणात तरी नागरिकांची गैरसोय टाळता येत होती. मात्र दिनांक 27 जानेवारी 2020 पासून सदर साइट काही कामानिमित्त बंद पडली असून गेले तीन दिवस कोणत्याही प्रकारे या साइटवरून खाते उतारे व सातबारे निघत नसल्याने गेले तीन दिवस सर्वच व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.

तसेच सदर वेबसाइट ही कोणत्या कारणास्तव बंद झाली असून ते काम कधी पूर्ण होणार? तसेच ही साइट कधी सुरु होणार? याबाबत कोणताही खुलासा या वेबसाइटच्या मुख्य पेजवर करण्यात आलेला नाही. यामुळे वेबसाइट कधी सुरु होणार व ठप्प होत असलेले व्यवहार कधी सुरु होणार याबाबत कोणालाही काहीही सांगता येत नाही. संबंधित कालावधीत मात्र महसूल विभागाच्या अधिकारी व तलाठी यांना महत्वाच्या कामासाठी हस्तलिखित सातबारे व खाते उतारे देण्याची वेळ आलेली आहे. सदर वेबसाइट तातडीने सुरु करून नागरिकांची गैरसोय लवकरात लवकर टाळावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.