उंड्री येथील ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलमधील प्रकार; पालकांची निदर्शने
कोंढवा – शाळेची फी भरली नाही म्हणून उंड्री येथील ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलने काही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केल्याची तक्रार पालक करत आहेत. शाळेच्या आडमुठ्या धोरणाच्या निषेधार्थ जवळपास 73 पालकांनी भरपावसात शाळेच्या प्रवेश द्वारासमोर निदर्शने केली.
उंड्री येथील इंग्रजी माध्यमाचे ऑर्किड्स दि इंटरनॅशनल स्कूल प्रशासन व पालक यांच्यामधील दरी कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. पालक आक्रमक होऊ लागले आहेत. लॉकडाऊमुळे व्यवसाय व नोकऱ्या धोक्यात आल्यामुळे अनेक पालकांची अर्थिक चणचण आहे. यातून 40 टक्के फी देण्यासही पालक तयार आहेत. मात्र, शाळा प्रशासन चर्चेस तयार नाही. सध्या, शाळा बंद आहे ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना देताना मोठी अर्थिक गुंतवणूक करण्याची गरज नाही, असे असताना शाळा प्रशासन पालक व विद्यार्थांना वेठीस का धरते? असा सवाल पालक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, शाळेने पुस्तकांसाठी चार सत्रांचे शुल्क घेतले आहे. मात्र, केवळ एकाच सत्राची पुस्तके दिली आहेत. काही पालकांनी शाळेची फी भरलेली नाही. मात्र, पुस्तकाची फी भरली आहे. अशा पालकांच्या मुलांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्यात आले असल्याचे पालक सांगत आहेत. याबाबत पालकांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे यांना निवेदन दिले आहे. यावेळी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी पालकांना दिले आहे.
शाळेकडून तांत्रिक अडचणीचे कारण…
या प्रकाराबाबत शाळा प्रशासनाकडे चौकशी केली असता तांत्रिक अडचण येत असल्याचे कारण देण्यात आले. परंतु, शाळा प्रशासनाकडून ऑनलाइन शिक्षणही बंद झाल्याने विद्यार्थी तसेच पालकांत नाराजी आहे. पालकांच्या तक्रारी विषयी शाळेच्या प्रिन्सिपल अनिता नायर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा मोबाइल बंद येत होता.