ऑनलाइन औषध विक्री सुरूच

बंदीची भीती नाही : रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार

पिंपरी – ऑनलाइन औषध विक्री करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली असतानाही ही बंदी झुगारून सध्या बिनदिक्कतपणे अशा प्रकारे औषध विक्री सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला न जुमानता सुरू असलेल्या ऑनलाइन औषध विक्रीने रूग्णांच्या जीवाशी खेळण्याचे कामच एकप्रकारे सुरू आहे. ऑनलाइन औषधांमध्ये 20 ते 25 टक्के सवलत दिली जात असल्याने अशा प्रकारच्या खरेदी-विक्री व्यवहाराला चालनाच मिळत असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.

केंद्र सरकारकडून ई-फार्मसी संदर्भातील नियम निश्‍चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अद्याप त्याबाबत कायदा तयार झालेला नाही. हे नियम निश्‍चित होईपर्यंत औषधांची बेकायदा किंवा परवानगीशिवाय ऑनलाईन विक्री करण्यास बंदी घालण्यात यावी; असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. मात्र, या आदेशाला न जुमानता सध्या सर्रासपणे ऑनलाइन औषध विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

अशा प्रकारे होते ऑनलाइन औषध विक्री
इंटरनेटवर काही संकेतस्थळांमार्फत ऑनलाइन औषध विक्री केली जात आहे. गुगलवर “ऑनलाइन मेडीसीन’ म्हणून सर्च केल्यानंतर सहजतेने ही संकेतस्थळे पाहता येतात. ऑनलाइन औषधांवर 20 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत सवलत दिली जाते. तर, लॅब तपासणी आणि आरोग्य तपासणीसाठी 35 टक्के सवलत असल्याचीही जाहिरात पाहण्यास मिळते. ऑनलाइन औषध विक्री करताना प्रामुख्याने दोन माध्यमांचा वापर केला जातो. पहिल्या प्रकारात डॉक्‍टरचे प्रिस्क्रीप्शन ऑनलाइन सबमिट करण्यास सांगितले जाते. त्यानुसार औषधे दिली जातात. तर, दुसऱ्या प्रकारात जर तुमच्याकडे डॉक्‍टरचे प्रिस्क्रीप्शन नसेल तर दूरध्वनीद्वारे डॉक्‍टरांचा मोफत सल्ला उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतर त्यानुसार गोळ्या पाठविण्यात येतात.

ऑनलाइन औषध विक्रीतील धोके
ऑनलाइन औषध मागविण्यासाठी फेक प्रिस्क्रीप्शनची शक्‍यता
झोपेच्या गोळ्या, गर्भनिरोधक गोळ्या सहजतेने उपलब्ध होऊ शकतात.
स्मार्ट फोनच्या माध्यमातून विविध औषधे मागवून गैरवापर होण्याची शक्‍यता
प्रिस्क्रिप्शन नसल्यास रूग्णाला न तपासता फोनद्वारे
डॉक्‍टरांकडून मिळणारा वैद्यकिय सल्ला ठरू शकतो घातक

ऑनलाइन औषध विक्री प्रकरणात पिंपरी-चिंचवडमध्ये दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच, जे औषध विक्रेते त्यामध्ये सहभागी असल्याचे आढळतात, त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येते.
– एस.बी.पाटील, सह-आयुक्त, (औषधे), अन्न व औषध प्रशासन.


ऑनलाइन औषध विक्री ही बंद व्हायला हवी. झोपेच्या आणि गर्भनिरोधक गोळ्या ऑनलाईन सहजतेने उपलब्ध होतात, ही बाब खूपच धोकादायक आहे.
– संतोष खिंवसरा, अध्यक्ष, पिं.चिं.केमिस्ट असोसिएशन

Leave A Reply

Your email address will not be published.