लवकरच ई-फार्मसीबाबतचे नियम करणार
नवी दिल्ली – ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालण्यात आल्याचे आज देशातील औषध नियंत्रक संस्थेच्यावतीने स्पष्ट केले. या संदर्भातील सूचना देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही बंदी घालण्यात आली असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.
सरकारकडून ई- फार्मसीसंदर्भातील नियम निश्चित केले जाईपर्यंत औषधांची बेकायदेशीरपणे किंवा परवान्याशिवाय ऑनलाईन विक्री करण्यास बंदी घालण्यात यावी, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. झहीर अहमद यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर डिसेंबर 2018 मध्ये दिलेल्या निकालामध्ये न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
“ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’चे हे आदेश गेल्या आठवड्यात जारी करण्यात आले आहेत. या आदेशाद्वारे कोर्टाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देशातील सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.
सर्व संबंधितांशी चर्चा करून ई- फार्मसीसंदर्भातील नियमांचा मसुद्याला अंतिम रूप दिले जात असल्याचे केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे.