ऑनलाइन अभ्यासक्रमाची डोकेदुखी पालकांच्या मुळावर!

पाल्यांशी असलेले भावनिक नाते दुरावतेय; आरोग्याच्या नव्या समस्यांचाही होतोय जन्म

नगर – करोना महामारीच्या संकटात शालेय अभ्यासक्रम ऑनलाइनपद्धतीने पूर्ण करण्याचा अनेक शाळा आणि खासगी क्‍लासेसचा अट्टाहास सध्या सुरु आहे. त्यासाठी सर्रासपणे मोबाईलचा वापर सुरु आहे. या उपक्रमाने बहुतेक पालकांची डोकेदुखी वाढली आहे. अनेकांचे पाल्यांशी असलेले भावनिक नाते तुटत चालले आहे. दुसरीकडे अनेकांना डोकेदुखी आणि डोळ्यांच्या नव्या आजारांनी ग्रासले आहे. स्पर्धेच्या युगात असलेल्या या प्रक्रीयेत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही भरडले जात असून, ते प्रचंड अस्वस्थ देखील आहेत.

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. त्यानुसार अजून अभ्यासवर्गांस परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शालेय अभ्यासक्रम कसे पूर्ण करावेत, अशी चिंता शाळा, महाविद्यालये व खासगी क्‍लासेसना आहे. त्यातून ऑनलाइन अभ्यासक्रमाचे नवे फॅड अलिकडे घट्ट होताना दिसते.

“झुम’सारख्या ऍपचा वापर शाळा व खासगी क्‍लासेसकडून सर्रास वापर होत आहे. त्याचा फायदा घेऊन काही पाल्य नंतर सोशल मीडियावर सर्रासपणे खेळताना दिसत आहेत. त्यामुळे ऑनलाइन अभ्यास संपला की सुरुच आहे, याची खात्री करावी लागत आहे. दरम्यान, आपल्या शाळेचा किंवा खासगी क्‍लासचा अभ्यासक्रम मागे पडू नये, यासाठी ही ओढाताण सध्या सुरु आहे. त्यात परिक्षा न घेताच जवळपास सर्वच अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यावर्षी उत्तीर्ण झाले. त्यामुळे पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढविण्याचाही अट्टाहास सध्या सुरु आहे. त्यातही ऑनलाइन अभ्यासक्रमांचा धोका सर्वानाच समजतो आहे.

मात्र, त्यातून केवळ स्पर्धेत मागे पडण्याचा धोका कुणालाच नकोय, म्हणून हा “रिस्क बेनिफिट’चा फंडा सर्रास स्वीकारला जात आहे. स्पर्धेत टिकण्याच्या अट्टाहासापायी नव्या समस्या निर्माण होणार नाहीत, याचीही काळजी ऑनलाइनचा पुरस्कारकर्त्या सर्वच शाळा, महाविद्यालये व खासगी क्‍लासेसना घ्यावी लागेल, अशीच सध्याची स्थिती आहे. म्हणून पालकांनीच आता जागरूक होण्याची गरज आहे.

हल्लीची मुलं सोशल मीडियाच्या अतिवापराने एकलकोंडी झाली आहेत. सोशल मीडियामुळे अगोदरच मुलांचा पालकांशी संपर्क अत्यंत कमी झाला आहे. अलिकडे मित्रांमध्येही ही मुलं फारशी मिस्क होताना दिसत नाहीत. अनेक मुलांनी वागणूकच त्यातून बदलत चालली आहे.

त्यांची सामाजिक “कनेक्‍टिव्हिटी’ संपत चालली आहे. अनेकजण मानसिक डिस्टर्ब आहेत. अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज अलिकडे भासू लागली आहे. त्यात ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या नावाखाली मुलांना सर्रास मोबाईल दिला जात आहे. त्यामुळे अभ्यासवर्ग संपल्यानंतरही ही मुलं सोशल मीडियावर खेळत आहेत. हा मोठाच धोका निर्माण होऊ पाहत आहे. त्यामुळे पालकांना याची वेळीच काळजी घ्यावी लागेल.
अनिल उदावंत , समुपदेशक, नगर.

“रिस्क बेनिफिट’लाही  नियम हवेतच
ऑनलाइन पद्धतीने सध्या सुरु असलेले सध्याचे शालेय अभ्यासक्रम “रिक्‍स बेनिफिट’ सदरात मोडतात. अभ्यासक्रम पूर्ण होण्याची गरज आहेच. मात्र, त्यासाठी काही नियम पाळणे अत्यावश्‍यक आहे. एकतर पाच वर्षांपेक्षा लहान मुलांचे अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने करुच नयेत. डोळ्यांच्या आजाराचा त्यांना जास्त धोका आहे. पाच वर्षानंतरच्या मुलांना “रिस्क बेनिफिट’ सदरात ऑनलाइन पद्धतीने मोबाईलच्या स्क्रीनवर अभ्यासक्रम शिकविता येईल. तथापि, त्यातही प्रत्येक वीस मिनिटांचा ब्रेक हवाच. अन्यथा त्याचेही दुष्परीणाम भोगावे लागतील. सर्वसाधारणपणे एका मिनिटात प्रत्येक व्यक्ती डोळ्यांची किमान 16 वेळा उघडझाप करते. मात्र, मोबाईलवर काम करणारे अतिलक्ष्य देत असल्याने त्यांच्याकडून ही उघडझाप एका मिनिटाला केवळ सहाच वेळा होते, असा एक निष्कर्ष आहे. स्क्रीनवर अतिलक्ष्य केंद्रीत केल्याने डोळ्यांमधील ओलावा कमी होतो.

त्यामुळे डोळे कोरडे पडतात. डोळ्यांच्या कडा लालसर होतात आणि त्यातून खाज सुटते. त्याचा डोळ्यांवर गंभीर परिणाम होतो. कधीकधी नजर कमी होते. चष्मा असेल तर त्याचा नंबर वाढण्याचा धोका अधिक वाढतो. डोळ्यांत असलेल्या अश्रुतून ऑक्‍सीजन मिळतो. तिथे कोरडेपणा वाढल्यास तेथील ऑक्‍सीजनही कमी होतो. तसेच स्क्रीनचा अतिवापर केल्यास त्यातून मज्जापेशी (रेटिना) कमजोर होतात. नजरेसाठी ते घातक ठरते. त्यासाठी पर्याय म्हणून लॅपटॉप किंवा टॅबलेट वापरता येईल. अर्थात तेही जास्त वापरणे धोकादायकच आहे. मात्र, मोबाईल स्क्रीनपेक्षा त्यातून धोका थोडा कमी होईल. डोळ्यांना कमीत कमी इजा होईल. अलिकडे काही विद्यार्थ्यांना डोकेदुखीचाही त्रास वाढला आहे. हे त्याचेच लक्षण आहे. जास्त वेळ स्कीनवर असलेली मुलं तणावातच असतात. त्यातून त्यांना डोकेदुखी जडते.
डॉ. प्रफुल्ल चौधरी संचालक, स्वस्तिक नेत्रालय, नगर. 

Leave A Reply

Your email address will not be published.