पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनच्या काळात रोज नव्याने काय करायचे, असा प्रश्न बहुतांश जणांना पडतो; परंतु या प्रश्नावर एका युवकाने ऑनलाइन उत्तर शोधले असून, संचारबंदीच्या काळात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
व्हॉटस्ऍप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून ऑनलाइन स्पर्धा घेण्यात येत आहेत. कला जिवंत ठेवू या “हॅशटॅग’ अंतर्गत आयोजित केलेल्या या स्पर्धांमध्ये चित्रकला, छायाचित्रण, रांगोळी, मेहंदी, नृत्य, लेखन, अभिनय, गायन या कलांचा समावेश आहे.
कला क्षेत्रातील दिग्गज स्पर्धेचे परीक्षण करत आहेत. कला ही शाश्वत असते, तिचा नाश होऊच शकत नाही आणि म्हणूनच कलेला आपापल्या शहरात, घरातून जिवंत ठेवण्यासाठी आणि आपल्यातले कलाकार जपण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रत्येक कलाकारांना या ऑनलाइन स्पर्धेतून वाव मिळावा, नवीन कलाकार तयार व्हावेत, असा आमचा मानस असल्याचे अयोजक संकेत अनगरकर यांनी सांगितले.