गोयलगंगा इंटरनॅशनल स्कूलला पालिकेची नोटीस
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील गोयलगंगा इंटरनॅशनल शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना शाळेचे शुल्क एकरकमी भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही त्यांचे गूगल ऍक्सेस बंद करण्यात आले आहे. त्यावर पालकांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करत तक्रार दाखल केली होती. अखेर शिक्षण विभागाने या शाळेला नोटीस पाठवली आहे.
पिंपरी येथे गोयलगंगा इंटरनॅशनल स्कूल आहे. करोनामुळे अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांच्या शाळेचे शुल्क भरू शकत नाही. ऑनलाइन क्लासचे कारण शाळा प्रशासन देत आहे. पालकांकडून लाखो रुपये फी स्वरुपात घेतले जात आहेत. याबाबत पालकांनी वारंवार शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने गोयलगंगा इंटरनॅशनल स्कूलला नोटीस पाठवली आहे.
शाळा व्यवस्थापनाने पालकांना संपूर्ण फी एकरकमी भरण्याची सक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही याबाबत शिक्षण उपसंचालकांकडे शाळा प्रशासनाने ग्वाही दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे गूगल ऍक्सेस त्वरित सुरू करावे अन्यथा शाळेची मान्यता काढून घेण्यात येईल.
तसेच याबाबत तीन दिवसांत समक्ष हजर राहून समाधानकारक खुलासा न केल्यास मोफत व सक्तीचा शिक्षण अधिनियम 2009 कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिला आहे.