सोमेश्वरनगर -रक्षाबंधनावर करोनासह आर्थिक मंदीचे सावट दिसून आले. दरवर्षीप्रमाणे सोमेश्वरनगरची गजबजलेली मुख्य बाजारपेठ यंदा ओस पडली आहे. आठ दिवसांपूर्वी गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठेत शुकशुकाट होता. त्यामुळे करोनाच्या महामारीत राखीपौर्णिमेला ऑनलाइनचा बंध अतूट झाला आहे.
राखी बांधून भावाला ओवाळण्याची प्रथा खंडित होणार आहे. त्यामुळे बहुतांश बहिणी भावाला ऑनलाइन राखी पाठवण्यावर भर देणार आहेत. काहींनी गेल्यावर्षी भावाला राखी बांधतानाचे फोटो भावांना व्हॉट्सऍपद्वारे पाठवण्यास सुरुवात केली आहे. बहिण भावाकडे जाऊ शकत नसल्याची खंतही मेसेजमध्ये पाठवण्यात येत आहे.
परिसरात सोमेश्वर कारखाना रोड, करंजेपूल मुख्य चौक वाणेवाडी, पॉलिटेक्निकल कॉलेज, बसस्थानक परिसरात राखी स्टॉल लावले जातात. बाजारपेठेत झुंबड उडते. आज दोन दिवस सुट्टी असूनही गर्दीचा लवलेशही दिसून आला नाही.