डाळिंबाचा होणार ऑनलाइन लिलाव

पुणे – ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार योजनेअंतर्गत (ई-नाम) पुणे बाजार समितीने डाळिंबाचा समावेश केला आहे. या योजनेनुसार 11 जूनपासून डाळिंबाचे लिलाव ऑनलाइन होणार आहेत.

पणन संचालकांनी नुकतीच ई-नाममध्ये सहभागी झालेल्या बाजार समित्यांची आढावा बैठक घेतली. यानंतर पुणे बाजार समितीमध्ये कांदा, बटाटा आणि डाळिंब हा 100 टक्‍के शेतीमाल हा शेतकऱ्यांचा असल्याने या शेतीमालाचा लिलाव ई-नाम अंतर्गत करण्याच्या सूचना बाजार समितीला दिल्या होत्या. त्यानुसार बाजार समितीने पहिल्या टप्प्यात डाळिंबाचा समावेश केला आहे. यापूर्वी गुळाच्या ऑनलाइन लिलावाला अडत्यांनी विरोध केला होता. त्यावर बाजार समितीने अडत्यांना परवाने निलंबनाचा इशारा दिल्यानंतर सध्या ते लिलाव प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार योजनेनुसार मागील काही दिवसांत डाळिंब आडत्यांना आनलाइन लिलावाबाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आहेत. रविवारी (दि.2) बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी डाळिंब आडत्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. पुणे बाजार समितीत डाळिंब आणि कांद्यासाठी स्वतंत्र यार्ड असल्याने या ठिकाणी ऑनलाइन लिलाव करणे तुलनेने सोपे आणि शक्‍य होणार आहे.

पुणे बाजार समितीत मोठ्या प्रमाणात डाळींबाचा व्यापार करणारे सुमारे 12 ते 14 आडते आहेत. ऑनलाइनबाबत आडत्यांना मार्गदर्शन केले असून प्रात्यक्षिकेही दाखविण्यात आली आहेत. ऑनलाइन लिलावामुळे शेतकऱ्यांना जास्त भाव मिळून फायदा होईल.
– बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.