पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरशिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार नसून, केवळ 30 गुणांसाठी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा जुलै अथवा ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी स्वरुपाची असेल, तीही घरबसल्या विद्यार्थ्यांना मोबाईलद्वारे परीक्षा देता येणार आहे, अशी माहिती मुक्त अध्ययन प्रशाळेचे संचालक डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.
विद्यापीठात यंदाच्या वर्षापासून मुक्त अध्ययन प्रशाळा अंतर्गत दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. त्यानुसार या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच वर्षी सुमारे 7 हजार 500 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमित अभ्यासक्रमाच्या केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांची परीक्षा शासनाच्या आदेशानुसार घेण्यात येणार नाही. म्हणजेच दूरशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांची 70 गुणांची लेखी परीक्षा नसेल; मात्र केवळ 30 गुणांसाठी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्यात येणार असून, ती ऑनलाईनद्वारे होईल. या परीक्षेसंदर्भातील सर्व तपशील जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुक्त अध्ययन प्रशाळा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले.
दरम्यान, करोनामुळे दूरशिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष निश्चित केले आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2019-20 या वर्षाची गणना ही ऑगस्ट 2019 ते सप्टेंबर 2020 अशी असणार आहे. तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य संचारबंदी उठविल्यानंतर त्यांनी ज्या अभ्यासकेंद्रावर प्रवेश घेतलेला आहे, त्या अभ्यासकेंद्रावर साधारणपणे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दूरशिक्षण अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचे प्रवेश हे ऑगस्ट – सप्टेंबर या दरम्यान सुरू करण्यात येणार असून, त्याबाबत सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे डॉ. सोनवणे यांनी म्हटले आहे.
दूरशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांची कॉऊन्सिल संचारबंदीच्या पूर्वीच प्रक्रिया पूर्ण झाली. यंदा प्रवेशाचे पहिले वर्ष असल्याने पूर्णत: परीक्षा शासनाच्या धोरणानुसार घेता येणार नाही. मात्र अंतर्गत मूल्यमापनासाठी 30 गुणांची ऑनलाईन परीक्षा होईल. ही परीक्षा विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप, संगणकावरून देता येऊ शकेल. त्यासाठी अभ्यासकेंद्रावर जावे लागणार आहे. अशा पद्धतीने अंतर्गत मूल्यमापन परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.
डॉ. संजीव सोनवणे
संचालक : मुक्त अध्ययन प्रशाळा