पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या मार्च मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शाळांना नियमित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा आज (मंगळवार) पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नियमित शुल्कासह 5 नोव्हेंबरपर्यंत परीक्षांचे अर्ज भरता येणार आहेत.
राज्य मंडळातर्फे परीक्षा अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. माधमिक शाळांना त्याबाबतच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. शाळांनी पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत वब तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज दि.6 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत भरता येणार आहेत.
विलंब शुल्कासह 16 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. माध्यमिक शाळांना चलन डाऊनलोड करुन बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी 16 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीची मुदत देण्यात आली आहे, असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
शाळांनी विभागीय शिक्षण मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या दि.4 डिसेंबर रोजी जमा करावयाच्या आहेत. विद्यार्थ्यामार्फत परीक्षा अर्जातील माहिती सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. दुष्काळ, टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसाठी विद्यार्थ्यांची आवश्यक ती माहिती शाळांकडून भरुन घेण्यात यावी. कौशल्य सेतु अभियानाचे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट मागणाऱ्या विद्यार्थ्यांनीही ऑनलाइन परीक्षा अर्ज भरणे गरजेचे आहे, अशा सूचनाही दिल्या आहेत.