‘आरटीई’च्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जास 15 दिवसांची मुदत

पुणे – बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार “आरटीई’च्या 25 प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी पालकांना 15 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. येत्या सोमवार (दि. 25) पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

शासनाच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळांमधील आरटीईअंतर्गतची प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. याबाबतचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशासाठी “आरटीई’चे पोर्टलही कार्यान्वित करण्यात आलेले आहे. प्रवेशपात्र शाळांच्या नोंदणीला 8 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून येत्या शुक्रवारी (दि. 22) ही मुदत संपणार आहे. या नवीन शाळांनाही नोंदणी करण्याची संधी देण्यात आलेली आहे. शाळांच्या नोंदणीची तपासणीही करण्यात येणार आहे.

शाळांची नोंदणी व तपासणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या 11 मार्चपर्यंत पालकांना अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. पालकांनी अर्जात ऑनलाइन सर्व माहिती भरणे आवश्‍यक आहे. आवश्‍यक ती कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत. 14 व 15 मार्चला प्रवेशासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मुलांचा शाळेतील प्रवेश निश्‍चित होणार आहे. ऑनलाइन अपूर्ण माहिती भरणाऱ्या व कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्यांना प्रवेशासाठी संधी मिळणार नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.