पुणे: पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात ओंकार यादव (166 धावा) व प्रथमेश बजारी (126 धावा) यांनी केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर संयुक्त जिल्हा संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघापुढे 406 धावांचे आव्हान उभे केले आहे. तर, दुसऱ्या सामन्यात यश मंगवानी नाबाद 61, आर्यन ए. 40 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर केडन्स संघाने 249 धावा केल्या.
या दोन दिवसीय लढतीत पहिल्या दिवशी संयुक्त जिल्हा संघाने प्रथम फलंदाजी करताना 90 षटकांत 6 बाद 406 धावा केल्या. यात ओंकार यादवने 258 चेंडूत 20 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 166, तर प्रथमेश बजारीने 154 चेंडूत 17 चौकारांच्या मदतीने 126 धावा केल्या. ओंकार यादव व प्रथमेश बजारी यांनी दुसऱ्या गडयासाठी 280 चेंडूत 187 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला.
त्यानंतर ओंकार यादवने क्षितिज पाटीलच्या (नाबाद 60) साथीत चौथ्या गड्यासाठी 131 चेंडूत 11 धावांची भागीदारी करून संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली. व्हेरॉक संघाकडून रोहित चौधरी (133-2), यश जगदाळे (48-2) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. संयुक्त जिल्हा संघ व व्हेरॉक यांच्यातील सामन्याचा अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.
दुसऱ्या सामन्यात केडन्स संघाने 90 षटकात 9 बाद 249 धावा केल्या. यात यश मंगवानी नाबाद 61, आर्यन ए. 40, प्रद्युम्न चव्हाण 36, अभिजित सावळे 34, तेजस बांदल 30 यांनी धावा केल्या. पीवायसीच्या यश खळदकरने सुरेख गोलंदाजी करत 26 धावात 4 गडी बाद केले. याच्या उत्तरात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आज दिवसअखेर 2 षटकात बिनबाद 12 धावा केल्या.