- किरकोळ बाजारातील भाव : 20 ते 30 रुपये किलो
पुणे – नवीन गरवी कांद्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर मार्कैटयार्डात कांद्याची आवक चांगल्या प्रमाणात होत आहे. परिणामी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी घाऊक बाजारात एक किलो कांद्याचा 30 ते 35 रुपये असणारा भाव आता 10 ते 13 रुपयांवर आला आहे. पुढील महिनाभर तरी कांद्याचे कमी झालेले भाव टिकून राहण्याचा अंदाज व्यापारी वर्तवत आहेत. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची 20 ते 30 रुपयांनी विक्री केली जात आहे.
मार्केटयार्डात कांद्याची दररोज सुमारे 50 ट्रक आवक होत आहे. यात पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक आवक होत असून सातारा, नगर जिल्ह्यांतून कमी प्रमाणात आवक होत आहे. घाऊक बाजारात 10 किलो कांद्याला प्रतवारीनुसार 100 ते 130 रुपये भाव मिळत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी हे भाव 300 ते 350 रुपयांवर होते, अशी माहिती कांद्याचे आडतदार रितेश पोमण यांनी दिली.
पोमण म्हणाले, “महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिणेकडील राज्यांतून मोठी मागणी असते. कर्नाटकमध्ये स्थानिक कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे. परिणामी, तेथून कांद्याला होणारी मागणी आता घटली आहे. केरळमधून केवळ मागणी आहे. गुजरातमध्येही कांद्याचे चांगले उत्पादन असल्याने तेथूनच कांदा परराज्यांत विक्रीस पाठवला जात आहे.’