नवी दिल्ली – खरिपाचा कांदा आता बाजारात उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळे कांद्याचे दर लवकरच कमी होतील अशी आशा ग्राहक व्यवहार मंत्रालयाने व्यक्त केली. या मंत्रालयाच्या अधिकार्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, गेल्या महिन्यात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र आता खरिपाचा कांदा वेगाने बाजारात येत आहे. त्यामुळे हा तुटवडा कमी होईल आणि कांद्याचे दर कमी होतील. गेल्या महिन्यात वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने आपल्याकडील बराच कांदा कमी दरावर मोठ्या शहरात ग्राहकांना उपलब्ध केला आहे.
त्यामुळे ग्राहकांची गरज भागली आहे. आता खरिपाचा कांदा बाजारात येणार असल्यामुळे सरकारला जास्त हस्तक्षेप करावा लागणार नाही. सरकारने गेल्या महिन्यात कांदा उपलब्ध केल्यामुळे सध्या कांद्याचा दर 54 रुपये प्रति किलो या पातळीवर असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सरकारने 35 रुपये किलो दराने हा कांदा उपलब्ध केला आहे. सरकारकडे 4.5 लाख टन कांदा आहे. त्यातील दीड लाख टन कांदा आतापर्यंत उपलब्ध करण्यात आला.
यावर्षी प्रथमच विविध राज्यात कांदा पाठविण्यासाठी रेल्वेचा वापर करण्यात आला. त्यामुळे हा कांदा वेगात बाजारपेठेत जाण्यास मदत झाली. जोपर्यंत कांद्याचे दर पूर्णपणे नियंत्रणात येणार नाहीत तोपर्यंत हा कांदा रेल्वेद्वारे पाठविला जाणार आहे. दिल्ली, चेन्नई, गुवाहाटीला 4,850 टन कांदा पाठविण्यात आला आहे.
हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे भविष्यात या पद्धतीचा वापर केला जातो जाऊ शकेल. गेल्या आठवड्यात काही सणामुळे बरेच कामगार आपल्या राज्यात परत गेले होते. याचा परिणाम कांद्याच्या बाजारपेठेवर आणि वाहतुकीवर झाला आता. आता हे कामगार परत आले आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये कांद्याचे दर वेगाने कमी होतील असे स्पष्ट करण्यात आले.