किरकोळ बाजारात 100 ते 120 रुपये किलो भाव
पुणे – मार्केट यार्डात कांद्याची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त आहे. त्यामुळे कांदाचे भाव घाऊक बाजारात प्रती किलो 90 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. हा भाव आतापर्यंत उच्चांकी आहे. किरकोळ बाजारात 100 ते 120 रुपये किलो भावाने कांद्याची विक्री होत आहे.
आवक कमी होत असल्याने मोजक्याच शेतकऱ्यांना वाढलेल्या भावाचा फायदा होत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला उन्हाळ कांदा आता संपत आला आहे. परिणामी, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत आता उन्हाळ कांद्याची आवक घटली आहे. तर, दुसऱ्या बाजूला नव्या कांद्याची कासवगतीने आवक होत आहे. रविवारी नवा आणि जुन्या कांद्याची प्रत्येकी 40 ट्रक आवक झाली. नव्या कांद्याला कमीत कमी 3 हजार ते जास्तीत जास्त 6 हजार 500 रुपये तर जुन्या कांद्याला कमीत कमी 8 हजार ते जास्तीत जास्त 9 हजार असा भाव राहिला. एरवी 100 ते 150 ट्रक कांद्याची आवक होत असते.
यंदा परतीचा पाऊस लांबल्याने त्याचा फटका कांद्याच्या नव्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात बसला. जुना आणि चांगल्या दर्जाचा कांदा केवळ महाराष्ट्रातच उपलब्ध आहे. त्यास दक्षिण भारतातून मागणी आहे. याविषयी व्यापारी विलास रायकर आणि रितेश पोमण म्हणाले, अवकाळी पावसाचा फटका नव्या कांद्याला बसला आहे. बाजारात येत असलेला माल ओला असून त्याला स्थानिक परिसरातून मागणी आहे. जुन्या कांद्याला परराज्यातून मागणी वाढली आहे. मात्र, त्याचा साठा संपत आल्याने कांद्याच्या भावाने शंभरी पार केली आहे. बाजारात चांगल्या दर्जाच्या कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.