कांदा आणखी रडवणार

पुणे  – देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या भावात वाढ होत आहे. येणाऱ्या दिवसांत यात आणखी भर पडत कांद्याचे भाव वाढणार असल्याचे संकेत “नाफेड’ अर्थात राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेने दिले आहेत.याशिवाय कांदा पाकिस्तानातून आयात होत असल्याची चुकीची माहिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यासह देशात कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याचे भाव हे घाऊक आणि किरकोळ बाजारातही वाढत आहेत. विविध देशांसह पाकिस्तानातून कांदा आयात केला जाणार असल्याचे वृत्त समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला; मात्र ही अफवा असल्याचे “नाफेड’ने स्पष्ट केले आहे. मध्यंतरीच्या काळात पाकिस्तानला विशेष आयातीसाठी दिलेला दर्जा काढून टाकल्याने तेथून कांदा आयात होऊच शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची ही फक्त अफवा आहे. येणाऱ्या दिवसात नवीन कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत अशीच कांद्याची होलसेल बाजारात भाव वाढ होणार आहे.

कांदा भाव वाढीतून शहरी भागातील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने 50 हजार मेट्रिक टन खरेदी केलेल्या कांद्यातून आतापर्यंत 25 टक्के, म्हणजे साडेबारा हजार मेट्रिक टन कांदा हा शहरी भागात पाठवण्यात आला आहे. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई अशा मेट्रो शहरातील ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे.

…म्हणून पाकिस्तानातून कांदा येणार नाही

पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला दिलेला विशेष दर्जा काढला होता. यानंतर पाकिस्तानमधून भारतात होणारी आयात जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे सत्तेत कोणीही असल्यास इतक्‍या मोठ्या प्रमाणात कांदा आयात करू शकणार नाही. कांदा आयात करण्याची निविदा काढण्यात आली तरी कांद्याच्या बाजार भावावर कुठलाही परिणाम होणार नाही, असे “नाफेड’ने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.