नवी दिल्ली – केंद्र सरकार खाद्यांनाचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच कांद्याचे दर वाढून पाच वर्षाच्या उचांकावर गेले आहेत. गेल्या चार दिवसात कांद्याचा दर 21 टक्क्यांनी वाढून आता 60 रुपये प्रति किलो पेक्षा जास्त झाला आहे. यामुळे एकूणच अन्नधान्याच्या महागाईवर नकारात्मक परिणाम होणार आहे.
अशा परिस्थितीत आक्टोबर व नोव्हेंबर महिन्याची किरकोळ महागाईची आकडेवारी फुगण्याची शक्यता आहे. तसे झाले तर रिझर्व बँकेची व्याजदर कपात आणखी लांबीवर पडण्याची भीती व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यात तयार झालेला कांदा ज्या राज्यात कांदा तयार होत नाही तेथे रेल्वेने पुरविण्याचा प्रयत्न गेल्या एक महिन्यापासून केंद्र सरकार करत आहे.
त्यामुळे कांद्याची उपलब्धता वाढली असली तरी दर मात्र कमी झालेले नाहीत. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्यापासून कांद्याच्या दरात वाढ होत आहे. आता तो दर पाच वर्षाच्या उच्चांकावर गेला आहे. महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज होऊ नये यासाठी कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात आली असल्याचे बोलले जाते.
लोकसभा निवडणुकावेळी भारतीय जनता पक्षाला यामुळे बराच फटका बसला असल्याचे समजले जाते. महाराष्ट्रातील लासलगाव बाजारपेठेमध्ये कांद्याचा दर 4 नोव्हेंबर रोजी 47 रुपये होतात. तो 7 नोवेंबर रोजी 57 रुपयांवर गेला आहे. कांद्याचा दर असाच वाढल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर कांद्याचे दर आणखी भडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील महागाईचा दर वाढून 5.5% पेक्षा जास्त होऊ शकतो, असे गेल्या आठवड्यात रिझर्व बँकेचे गव्हर्नर लक्ष्मीकांत दास यांनी सुचित केले आहे.