संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
संगमनेर – उत्तर प्रदेशातील दोन व्यापाऱ्यांनी संगमनेरमधील एका व्यापाऱ्याकडून कांदे खरेदी केले. मात्र, त्या दोघांनी एका बंद झालेल्या बॅंकेचा धनादेश देऊन तब्बल एक कोटी 33 लाख 66 हजार 803 रुपयांची संगमनेरच्या व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे. हा प्रकार 25 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2020 दरम्यान घडला. याप्रकरणी शनिवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमन राजपूत व मनमोहन राजपूत (दोघेही राहणार, ललई, खैरगड, जि.फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी मनोहर दगडू सातपुते (वय 38, रा. खांजापूर, सुकेवाडी शिवार, ता.संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोहर सातपुते हे संगमनेरातील कांद्याचे व्यापारी आहेत. अमन राजपूत व मनमोहन राजपूत या उत्तर प्रदेशातील दोन व्यापाऱ्यांनी सातपुते यांच्याकडून कांदे खरेदी केले होते. हे कांदे त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी ट्रान्सपोर्टने पाठविण्यात आले होते. पाठविलेल्या कांद्याचे पैसे मिळण्यासाठी सातपुते यांनी अमन राजपूत व मनमोहन राजपूत यांना वारंवार फोन केले. मात्र, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. पाठविलेल्या कांद्याची रक्कम एक कोटी 33 लाख 66 हजार 803 इतकी होती. या रकमेपोटी सातपुते यांना त्यांनी धनादेश दिला होता.
हा धनादेश बॅंक खात्यात भरण्यासाठी सातपुते गेले असता त्यांना तो बंद असलेल्या बॅंक खात्याच्या असल्याचे सांगण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी तपास करीत आहेत. संगमनेर येथील मनोहर सातपुते यांनी राजपूत यांना फोन केले असता त्यांचा फोन बंद होता. आपल्याकडून कांदे खरेदी करून त्याबदल्यात पैसे न देता फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर सातुपते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.