ई-पीक पाहणी ऍपद्वारे नोंदणी : ज्वारीची नोंद दुसऱ्या क्रमांकावर
पुणे – शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ऍपद्वारे रब्बी हंगामातील पिकांची माहिती नोंदविली आहे. या माहितीनुसार जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर कांदा हे पीक घेण्यात आले आहे. त्यानंतर ज्वारी आणि ऊस या पिकांचे क्षेत्र आहे. दरम्यान, जिल्ह्यात विविध प्रकारची एकूण 216 पिके शेतकऱ्यांनी घेतली आहे. पहिल्यांदाच रब्बी हंगामातील लागवडीखालील क्षेत्र, त्यामधील पिके यांची अचुक माहिती उपलब्ध झाली आहे.
शेतकरी प्रत्यक्ष शेतावर जाऊन ई-पीक पाहणी या मोबाइल ऍपद्वारे फोटो अपलोड करत आहे. या मोबाइल ऍपमध्ये अक्षांक्ष व रेखांशची नोंद होणार असल्याने शेताचे स्थानही समजत आहे. तलाठ्यांकडून या फोटो व स्थानाची पडताळणी होत असून त्यानंतर शेतातील पिकांची नोंद संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर घेतली जात आहे. जिह्यात कांदा हे पीक 11 हजार 943 हेक्टरवर, ज्वारी 4 हजार 73 हेक्टरवर आणि ऊस पिकाची 2 हजार 199 हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.
ऊस तिसऱ्या स्थानावर
जिल्ह्यात सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांची मांदियाळी आहे. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र तिसऱ्या स्थानावर आहे. दोन हजार 199 हेक्टर ऊस शेती आहे. पाच हजार एकर शिवारातील हे ऊस पिकाला शेतकरी फाटा देत कांदा पिकाकडे वळले असल्याचे दिसत आहे. ऊस गाळपातील अडचणी, एफआरपीचा प्रश्न, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती आदी कारणांमुळे शेतकरी ऊस पिकाला फाटा देऊन रब्बी हंगामातील पिकाकडे वळत असल्याचे ज्वारी पिकाच्या नोंदीवरून दिसून येत आहे.