बाजारपेठांमध्ये कांद्यांचे वितरण करण्याची जबाबदारी नाफेडवर
पुणे – देशात कांद्याची मोठी कमतरता जाणवत असल्याने, कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नागरिकांना कमी दराने कांदा उपलब्ध करून देण्यासाठी एमएमटीसीला एक लाख मेट्रीक टन तुर्कस्तान व इजिप्तमधून कांदा आयात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय हा कांदा देशाच्या विविध बाजारपेठांमध्ये वितरित करण्याची जबाबदारी नाफेडवर सोपविण्यात आली आहे.
देशाला लागणाऱ्या एकूण कांद्यांपैकी निम्मे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेतले जाते. राज्यात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ही सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. गेली दोन अडीच महिन्यांपासून कांद्याचे उत्पादन घटले असून त्यामुळे कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आहारातून कांदा गायब झाला आहे. कांद्याचे दर वाढविण्यात व्यापारी लॉबीचा हात असल्याच्या संशयावरून आयकर विभागाच्या वतीने लासलगावमधील कांद्याच्या व्यापाऱ्यांच्या घरावर धाडी घातल्याने व्यापरी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय नागरी पुरवठा विभागाने एमएमटीसीला येत्या महिनाभरात एक लाख मेट्रीक टन कांदा परदेशातून आयात करण्याची सूचना केली आहे. इजिप्तमधील कांदा आयातीला सुरुवात झाली आहे, तर तुर्कस्तानमधून अद्यापही कांदा देशात आलेला नाही. इजिप्तमधून होणारी आयात वाढविण्याबरोबरच तुर्कस्तानमधून कांदा आयात करण्यासाठी तातडीची पावले उचलण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, या दोन्ही देशांमध्ये प्रतिनिधी पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय दुबईमधूनदेखील कांदा उपलब्ध होतो का, याची चाचपणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
अवकाळी पावसाचा बसला फटका
नाशिक जिल्हा कांद्याचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. यंदा या जिल्ह्यात 53 हजार 672 हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे 17 हजार 658 हेक्टरला फटका बसल्याने कांद्याचे उत्पादन निम्म्याने घटण्याची शक्यता आहे. कांदा बाजारपेठांमधील परिस्थिती पाहुन कांदा आयातीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.