नेहमीच्या तुलनेत तिप्पट माल बाजारात दाखल
पुणे – कांद्याच्या भावात होत असलेली घसरण…दोन दिवस मार्केट यार्डाला असलेली सुट्टी…सोलापूर बाजार समिती बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 24) मार्केट यार्डात तब्बल साडेतीनशे ट्रक कांद्याची आवक झाली. ही आवक शुक्रवारी नेहमी होण्याच्या तुलनेत तिप्पट आहे. रविवारच्या (दि. 19) तुलनेत भावात किलोमागे 15 ते 16 रुपयांनी घसरण झाली आहे.
रविवारी घाऊक बाजारात किलोस 40 ते 48 रुपये भाव मिळत होता. तो शुक्रवारी 25 ते 32 रुपयापर्यंत खाली आल्याची माहिती कांद्याचे व्यापारी गणेश शेडगे यांनी दिली. दरम्यान, किरकोळ बाजारात 55 ते 60 रुपये किलो भावाने विक्री होत असल्याची माहिती मार्केट यार्डातील किरकोळ विक्रेते संघटनेच्या प्रकाश ढमढेरे यांनी दिली. लांबलेला पावसामुळे पिकाचे झालेले नुकसान आणि मुबलक प्रमाणात जुना माल उपलब्ध नसल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले होते.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कांद्याचे भाव किलोला 100 ते 130 रुपयांपर्यंत पोहोचले होते. किरकोळ बाजारात 150 ते 160 रुपये किलो भावाने कांद्याची विक्री होत होती. या वाढलेल्या भावाची दखल घेत केंद्र सरकारने इजिप्त, तुर्की आणि अफगाणिस्तान येथून कांद्याची आयात केली होती. मात्र, हा कांदा खरेदीकडे पुणेकरांनी पाठ फिरविली होती. सध्याच्या परिस्थितीविषयी व्यापारी गणेश शेडगे म्हणाले, सध्या नवीन कांद्याची आवक वाढली आहे. जिल्ह्यातील खेड, मंचर, अहमदगर, संगमनेर भागातून आणि सोलापूर जिल्ह्यातून कांद्याची आवक होत आहे. कांद्याचे भाव आता उतरू लागले आहेत. त्यामुळे आताच जास्त भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणण्यास सुरूवात केली आहे.