सातगाव पठार भागात कांदा लागवड सुरू

कांद्याला वाढती मागणी ः ज्वारी पिकावर परिणाम होण्याची शक्‍यता

पेठ- सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू केली आहे. कांद्याला वाढती मागणी लक्षात घेऊन कांदा लागवड केल्याने ज्वारी पिकाच्या पिकावर परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत आहे.

सध्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांद्याचे बी टाकून रोपे तयार केली आहेत. आता ही रोपे जोमात आली असून, लागवडीसाठी तयार झाली आहेत. तीन फूट रुंद आणि शंभर फूट लांबीच्या गादी वाफ्याच्या कांदा रोपांची किंमत 4 ते 5 हजार रुपयांना विक्री होत आहे. अत्यंत महागडे रोप विकत घेऊन लागवड केली जात आहे. त्यातच रोगराई,औषधे, खते, फवारणी, खुरपणी आदी कामासाठी वेगळा खर्च होत आहे. दिवाळी सण आता जवळ आला आहे. शेतीत गुंतवलेले भांडवल, दिवाळी सण खर्च, आजारपण यांची तोंडमिळवणी करता करता नाकात दम येतो, असे अनेक शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवले.मात्र, सध्या कांद्याला असलेली चांगली मागणी पाहता सातगाव पठार भागात कांदा लागवड क्षेत्र वाढले आहे; पण ज्वारी पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्‍यता आहे.

  • प्रतिमजूर 300 रुपये मजुरी
    एक एकर शेती क्षेत्रात किमान 15 ते 17 हजार रुपये किमतीची रोपे विकत घेऊन लावावी लागतात. त्यासाठी प्रतिमजूर 300 रुपये मजुरी द्यावी लागत आहे. 15 ते 16 मजूर एका दिवसाला किमान पाऊण ते एक एकर कांदा लागवड करतात. एका दिवसासाठी साडेचार ते पाच हजार रुपये केवळ मजुरीसाठी द्यावे लागत आहेत. हे मजूर नारायणगाव किंवा राजगुरूनगर येथून सकाळी 10 वाजता आणणे व सायंकाळी साडेपाच ला पुन्हा वाहनाने नेऊन सोडावे लागत आहेत.
  • वाहन भाडे दीड हजार रुपये दयावे लागते. म्हणजे एकरी कांदा बियाणे, मजुरी, मजूर वाहतूक खर्च एकत्र धरून शेतकऱ्यांना कांदा लागवड साठी 22 ते 23 हजार एकरी खर्च होत असल्याने पतसंस्था, बॅंका व दागिने गहाण ठेऊन शेतीसाठी पैसा उपलब्ध करून घ्यावा लागत आहे.
    विशाल तोडकर, शेतकरी, पेठ
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.