आठवडाभरात कांदा दुप्पट महागला

पुणे – कांद्याची आवक घटली आहे. आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे मागील आठ दिवसात कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात मागील आठवड्यात 14 ते 16 रुपये कांद्याचे किलोचे भाव होते. त्यात वाढ होऊन रविवारपासून (दि. 18) कांद्याला प्रतिकिलोस 18 ते 22 रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची 35 ते 40 रुपये प्रतीकिलोने विक्री होत आहे.

मार्केट यार्डात सध्या साठवणुकीतील कांदा दाखल होत आहे. पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नगर जिल्ह्यांतून कांद्याची आवक होते. सध्या दररोज सुमारे 80 ते 100 ट्रक इतकी कांद्याची आवक होत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील पूरस्थितीमुळे कांद्याची आवक घटून भाववाढ झाली होती. तर, मागणी वाढल्याने मागील गुरुवारी (दि. 15) घाऊक बाजारात प्रती किलो कांद्याचे भाव 24 रुपयांवर पोहचले होते. पूरस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर कांद्याची आवक सुरळीत सुरू झाली आहे.

आवक वाढली असली, तरी हे भाव स्थिर राहून पुढील काही दिवस कांद्याच्या भावात तेजी राहण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती व्यापारी आणि आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष राजेंद्र कोरपे यांनी दिली. पावसाळ्यात कांद्याला जादा भाव मिळण्याची शक्‍यता असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा साठवणूक करून ठेवतो. दुष्काळ तसेच पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली. त्यामुळे ऐन पावसाळ्यात कांद्याचे भाव टिकून होते. पूरस्थितीच्या काळात आवक घटल्यामुळे भावात कांद्याच्या भावात हळूहळू वाढ होऊ लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.