चाकणला कांद्याची उच्चांकी आवक; भाव मात्र कोसळले

महाळुंगे इंगळे (वार्ताहर) – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये कांद्याची उच्चांकी आवक झाली. बुधवारी (दि. 29) कांद्याची तब्बल 125 ट्रक आवक झाल्याने दरात मोठी घसरण झाली.

कांद्याला 20 ते 25 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला असून, लहान व मध्यम आकाराच्या कांद्याला 10 ते 12 रुपये असा प्रती किलोला भाव मिळत असल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. त्यामुळे पुढील गणिते कोलमडण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

अवकाळी पाऊस, खराब हवामान यामुळे कांद्याचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटले आहे. आणि त्यातच आता कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू झाल्याने शेतकरी उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र शासनाने तात्काळ हटवण्याची मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे. बुधवारी (दि. 29) कांद्याला सरासरी 20 रुपये किलो असा दर मिळाला.

मागील शनिवारी (दि. 25) चाकण मार्केटमध्ये 14 हजार 733 क्विंटल कांद्याची आवक होऊन 1 हजार 200 ते 3 हजार 300 रुपये असा कांद्याला प्रती क्विंटलला भाव मिळाला होता. दरम्यान कांद्याला सरासरी 20 ते 22 रुपयांच्या दरम्यानच प्रती किलोला भाव मिळाल्याचे उत्तर पुणे जिल्ह्यातून चाकण मार्केटमध्ये कांदा घेऊन आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले की, शासनाने कांद्याबाबत योग्य धोरण आखणे गरजेचे आहे. शेतकरी अडचणीत येत असल्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. हंगाम सुरु असताना शासनाने तात्काळ निर्यात बंदी हटवावी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.