गुवाहाटी – उल्फा संघटनेच्या गनिमांनी ओएनजीसीचे कर्मचारी रितुल सैकिया यांचे 21 एप्रिल रोजी अपहरण केले होते. त्यांची आज सकाळी सुटका करण्यात आली. नागालॅंड मध्ये म्यानमारच्या सीमेवर त्यांना सोडून देण्यात आल्याचे आढळून आले आहे. 31 दिवसांच्या अवधीनंतर त्यांची ही सुखरूप सुटका करण्यात आली.
काहीं अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण करून त्यांना म्यानमार मध्ये नेण्यात आले होते. तेथेच त्यांना सोडून देण्यात आल्यानंतर चाळीस मिनीटे पायी चालून ते भारतीय हद्दीत आले आहेत.
भारतीय हद्दीत आल्यानंतर त्यांना लष्कराने व पोलिसांनी मोन पोलिस ठाण्यात नेले. तेथे औपचारीकता पुर्ण केल्यानंतर आज सायंकाळपर्यंत त्यांना घरी सोडण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. ते आसामातल्या जोरहाट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे शिवसागर जिल्ह्यातू अपहरण करण्यात आले होते.