शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण!

चंडीगढ  – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला उद्या (शुक्रवार) एक वर्षाचा कालावधी पूर्ण होणार आहे. आंदोलनाच्या वर्षपूर्तीला उपस्थित राहण्यासाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने दिल्लीच्या सीमांकडे कूच केले. त्यामुळे आंदोलनस्थळं बनलेल्या त्या सीमा आणखी गजबजणार आहेत.

कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनांनी मागील वर्षीच्या 26 नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनाच्या वर्षपूर्तीआधी माघार घेत मोदी सरकारने मागील आठवड्यात कायदे मागे घेण्याची घोषणा केली. मात्र, तेवढ्याने शेतकरी आंदोलक समाधानी झालेले नाहीत.

इतर मागण्याही मान्य करण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेनंतरही आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य समितीची बैठक 27 नोव्हेंबरला होणार आहे. त्या बैठकीत शेतकरी संघटनांची पुढील रणनीती ठरणार आहे. त्यामुळे बैठकीचा दिवस शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.