पुणे – म्हाडाच्या जुन्या वसाहतींचा पुनर्विकास व्हावा, यासाठी बांधकामांना परवानगी देण्यासाठी म्हाडाने एक खिडकी योजना सुरू केली आहे. यामध्ये 5 दिवसांत ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिली.
म्हाडाच्या अनेक वसाहती जुन्या झाल्या आहेत. तर काही वसाहतींमधील इमारती मोडकळीस आल्या आहेत. या सर्व कारणांमुळे म्हाडाच्या जुन्या वसाहतींचा पुनर्विकास होणे आवश्यक आहे. विविध कारणांमुळे या वसाहतींचा विकास होत नाही. पर्यायाने रहिवाशांना जुन्याच इमारतींमध्ये रहावे लागत आहे.
म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकासासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. यामध्ये म्हाडाच्या इमारतींमधील रहिवाशांची मंजुरी आवश्यक आहे. तसेच, विकसकही पुढे आले पाहिजेत. म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी येणाऱ्या प्रस्तावांना लवकर मान्यता देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. शासनाने यापूर्वीच म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा (एसपीए) दर्जा दिला असल्याचे म्हैसकर यांनी सांगितले.