भिडे पूल ते डेक्कन रस्त्यावर मनमानी वर्दळ
चालकांकडून नियम सर्रास मोडीत
पुणे – भिडे पूल ते डेक्कन या रस्त्यावर एकेरी वाहतूक आहे. मात्र, या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने हा “वन वे’ आहे की “टू वे’. याबाबत मनमानी वर्दळीमुळे गोंधळ निर्माण होत आहे.
डेक्कनकडे येण्यासाठी अनेक जण लकडी पुलाकडून येण्याऐवजी नदीपात्रातील रस्त्याचा “शॉर्टकट’ म्हणून उपयोग करतात. मात्र, हाच शॉर्टकट एखाद्याच्या जीवावर बेतण्याची देखील शक्यता या रस्त्यावर आहे. वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने बेदकारपणे वाहन चालविणाऱ्यांमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. भिडे पुलाकडून डेक्कनच्या रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर एकेरी वाहतूक आहे. या रस्त्यावरुन डेक्कन बसस्टॉपकडून नदीपात्रात येण्यास परवानगी आहे. परंतु, वाहन चालकांकडून या रस्त्याचा दोन्ही बाजूने वापर होतो. याशिवाय या रस्त्यावर अवजड वाहनांना देखील बंदी आहे. परंतु, दुचाकी, चारचाकींच्या बरोबरीने या रस्त्याने अवघड वाहने देखील येत आहे. याशिवाय डेक्कनकडील कोपऱ्यावर चहाची दुकाने आहेत. त्या ठिकाणी अनेक जण उभे असतात. याशिवाय दुसऱ्या बाजूला बसस्टॉप असल्याने, त्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील आहे. पादचाऱ्यांना देखील नदीपात्राकडून येणाऱ्या वाहनांचा धोका संभावतो.
दिशादर्शक फलकामुळे देखील संभ्रम
भिडे पुलाकडून डेक्कनकडे यायला परवानगी नाही. याबाबतचे फलक देखील या रस्त्यावर लावले आहेत. तर दुसरीकडे बसस्टॉपच्या बाजूला असणाऱ्या फलकाची दिशा मात्र वाहनचालकाला संभ्रमात टाकणारी आहे. संबंधित फलकावर असणाऱ्या चिन्हामुळे डेक्कनकडून भिडे पुलाकडे यायला बंदी आहे की जायला? असा प्रश्न वाहनचालकांच्या मनात उपस्थित होत आहे.
वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती
भिडे पूल ते डेक्कन या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. वाहनचालकांकडून या परिसरात सातत्याने नियमांचे उल्लंघन करण्यात येते. मात्र, रस्त्याला दोन्ही बाजूला अनेकदा वाहतूक पोलीस अनुपस्थित असतात. त्यामुळे वाहनचालकही बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे.