पुणे – नोकरी लावण्याच्या अमिषाने मुलाने पैसे घेतले आहेत. ते परत करा म्हणत, त्रास देत 62 वर्षीय महिलेला ढेकण मारण्याचे औषध देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणात एकाचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी फेटाळला.
आप्पा शिंदे असे त्याचे नाव आहे. त्याच्यासह अन्य चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. मंगल गोकुळ नार्वेकर (वय 62, रा. चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांची बहिण अलका राजू बाबर (वय 54, रा. चिंचवड) यांनी याबाबत चिखली पोलिसात फिर्याद दिली आहे. 23 जानेवारी ते 10 मार्च 2019 या कालावधीत ही घटना घडली.
मंगल यांचा मुलगा चंद्रशेखर याने महापालिकेत नोकरी लावण्याच्या पैसे घेतले असून, तो फरार आहे. त्यामुळे मंगल आणि फिर्यादींना त्रास देण्यात येत असत. या त्रासाला कंटाळून मंगल यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात आप्पा याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे.
मयत महिलेने मरण्यापूर्वी सुसाईट नोट लिहून ठेवली आहे. त्यामध्ये आप्पा शिंदे याच्या नावाचा उल्लेख आहे. यासाठी अटक करून त्याच्याकडे तपास करणे आवश्यक आहे. जामीन मिळाल्यास तो पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्यता आहे, यासाठी त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याचा युक्तीवाद ऍड. पाठक यांनी केला.