मयतांसाठी लागणाऱ्या साहित्याची पालिकेकडून खरेदी; वायसीएम प्रशासनाचा अंदाज
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने फैलावत असलेल्या करोनामुळे बाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि आजपर्यंत बाधितांचे गेलेले बळी आणि पुढील तीन ते सहा महिने करोनाचा प्रसार लक्षात घेता महापालिकेच्या वायसीएम प्रशासनाने मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांसाठीचे साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी एक हजार मयतांचा प्रशासकीय अंदाज समोर ठेऊन ही खरेदी केली जात असल्याने खळबळ उडाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह देशभरात करोनाच्या विषाणूने कहर माजविला आहे. पुणे, मुंबईपेक्षा पिंपरी-चिंचवड शहरात रुग्णांची संख्या आणि त्याच्या वाढीचा वेग कमी असला तरी प्रशासनाने मात्र करोनाच्या रुग्णांचे आणि मयतांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा अंदाज व्यक्त करत तयारी चालविली आहे. महापालिकेच्या भांडार विभागाकडे वायसीएम प्रशासनाने एक हजार मयतांसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी नोंदविली होती. त्यानुसार भांडार प्रशासनाने नुकतीच या खरेदीची निविदा प्रसिद्ध करत हे साहित्य खरेदी करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे.
भांडार विभागाने हे साहित्य खरेदी करण्यासाठी दरआधारित खरेदी प्रक्रिया राबविली आहे. त्यानुसार एक हजार मृतदेहांसाठी लागणाऱ्या 51 जीएसएमच्या प्लॅस्टिक बॅग तसेच कपड्यांची खरेदी केली जात आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि तेही मृतदेहांसाठी खरेदी करण्यात येत असल्याचे शहरात खळबळ उडाली आहे. करोना बाधितांचे मृतदेह प्लॅस्टिक पिशवीमध्ये शिवून (रॅप करून) दिले जात आहेत. आतापर्यंत पाचजणांचा मृत्यू करोनामुळे गेल्या दीड महिन्यात झाला असला तरी तब्बल एक हजार मृतदेहांसाठीची तयारी पालिका तथा वायसीएम प्रशासन करू लागल्याने बाधितांचा आकडा आणि मयतांचा आकडा वाढणार का? अशी चर्चा शहरात रंगली आहे.
प्रत्येक मृतदेह प्लॅस्टिकमध्ये दिला जाणार
पिंपरी-चिंचवड शहरात दरमहा 800 ते 900 जणांचे मृत्यू विविध कारणांमुळे होतात. यापुढे वायसीएममध्ये कोणत्याही आजाराने मृत्यू झाला तरी संबंधिताचा मृतदेह हा प्लॅस्टिक पिशवीमध्ये रॅप करून दिला जाणार आहे. करोना बाधिताच्या मृतदेहाप्रमाणेच सर्व मृतदेह संसर्ग रोखण्यासाठी रॅप केले जाणार आहेत, त्यामुळे एक हजार प्लॅस्टिक पिशव्या व कपड्याची मागणी भांडार विभागाकडे नोंदविण्यात आल्याची माहिती वायसीएमचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी दिली.