नगर – नगर जिल्हा सहकारी बॅंकेसह जिल्ह्यातील लहान-मोठ्या पतसंस्थांसह, दूध संघ यासह अन्य 1 हजार 684 सहकारी संस्थांच्या निवडणुका जानेवारी ते डिसेंबर 2020 मध्ये पार पडणार आहेत. या सर्व संस्थांची मुदत या काळात संपणार असून त्यांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तयार केली आहे.
जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यात जिल्हा बॅंक, नगर शहरातील काही नागरी बॅंकांसह, 1 कोटींपेक्षा अधिक भाग भांडवल असणाऱ्या संस्था ते मजूर संस्था यांचा देखील यात समावेश आहे. जानेवारी ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपणार्या अ ते ड वर्गातील संस्थांची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तयार केली आहे. जिल्ह्यात अ वर्गात जिल्हा बॅंक ही एकमेव संस्था असून उर्वरित संस्था, बॅंका, पतसंस्था, दूध संघ या ब, क आणि ड वर्गात मोडतात.
ब वर्गात मोडणार्या संस्थांमध्ये विभाग आणि राज्य स्तरात मोडणार्या विविध कार्यकारी संस्था, यासह 1 कोटींपेक्षा अधिक भागभांडवल असणार्या पतसंस्था, दूध, फेडरेशन यांचा यात समावेश आहे. येणाऱ्या वर्षभरात होणाऱ्या सहकार विभागातील सर्वाधिक निवडणुका या संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 246 असून, त्या खालोखाल 215 नगर तालुका तर सर्वात कमी निवडणुका या जामखेड तालुक्यात 45 होणार आहेत. होणाऱ्या निवडणुकांची तयारी जिल्हा उपनिबंधक विभागाने केली असून मुदत संपण्याच्या आत त्याठिकाणी निवडणुका घेऊन त्याठिकाणी नव्याने संचालक मंडळ अस्तित्वात येईल.