श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये गुरूवारी सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. ती चकमक कुपवाडा जिल्ह्यात झडली. गुप्तचरांनी दहशतवाद्यांच्या अस्तित्वाची माहिती दिल्यानंतर सुरक्षा दलांनी बुधवारपासून शोधमोहीम हाती घेतली. त्या माेहिमेवेळी एका ठिकाणी दडलेल्या दहशतवाद्याला सुरक्षा जवानांनी घेरले. त्यानंतर झालेल्या चकमकीत दहशतवादी मारला गेला.
त्याच्याकडील एके रायफल, हातबॉम्ब अशी सामग्री ताब्यात घेण्यात आली. याआधी मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यामध्ये एक दहशतवादी ठार झाला. बांदीपोरामधील त्या चकमकीत २ सुरक्षा जवान जखमी झाले.
मागील काही काळापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे आणखी सतर्क झालेल्या सुरक्षा दलांकडून धडक मोहिमा हाती घेतल्या जात आहेत.