आयुक्तांकडून स्पर्धा व बक्षिसांची घोषणा
पिंपरी – चोरट्यांच्या मागे पळणाऱ्या पोलिसांच्या हाती आगामी काळात झाडू दिसला तर आश्चर्य वाटायला नको. कारण पिंपरी चिंचवड पोलिसांचे पाऊल आता स्वच्छतेकडे वळविले आहे. पोलीस आयुक्तांनी 15 पोलीस ठाण्या अंतर्गत “स्वच्छ पोलीस ठाणे चषक’ आणि वसाहतीला “स्वच्छ पोलीस वसाहत चषक’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान होणार आहे. यामुळे पोलीस वसाहती आणि ठाण्यांमध्ये सध्या साफसफाई आणि डागडुजी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे.
शहरातील नव्याने झालेल्या पोलीस ठाण्यांचा अपवाद वगळता जुन्या बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये अस्वच्छता आहे. पोलीस वसाहतींवर लाखो रुपयांचा खर्च करूनही ठिकठिकाणी गळती लागून इमारतींवर झाडेही उगवली आहे. ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, जमिनीवरून वाहणारे सांडपाणी यामुळे पोलिसांचे जीवन धोक्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाने यापूर्वीच स्वच्छतेचा नारा दिला आहे. यामुळे पोलीस आयुक्त बिष्णोई यांनीही एक पाऊल स्वच्छतेकडे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एक नोव्हेंबरपासून या स्वच्छता स्पर्धेस सुरुवात केली आहे. येत्या 25 दिवसात पोलीस ठाण्यांचा परिसर व वसाहतींची डागडुजी केली जाणार आहे. याबाबत सर्व वरिष्ठ निरीक्षक आणि पोलीस लाईन दफेदार (देखरेख करणारे पोलीस कर्मचारी) यांना सूचना दिल्या आहेत.
ही समिती करणार विजेता घोषित
निकालासाठी आयुक्तांनी एक समिती तयार केली आहे. ही समिती पोलीस ठाणे आणि वसाहती यांची पाहणी करणार आहे. या समितीमध्ये परिमंडळ एक आणि दोनचे उपायुक्त, दोन सहायक आयुक्त आणि दोन निरीक्षक असणार आहेत. पन्नास गुणांची परीक्षा असणार आहे. वसाहतींना अंतर्गत स्वच्छता, नीटनेटकेपणा आदी मुद्द्यावर गुण देण्यात येणार आहेत. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे स्वतः या अभियानात सहभागी होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका यांच्याशी समन्वय साधून आवश्यक बाबींच्या पूर्तता करण्यात येणार आहे. त्यासाठी अपर आयुक्त पोकळे यांच्या मार्फत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
हिंजवडी, वाकड, दिघी आणि भोसरी एमआयडीसीत चुरस?
पोलीस ठाण्यांच्या इमारती आणि सभोवातलचा परिसर याबाबत विचार केल्यास हिंजवडी, वाकड, दिघी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चुरस होण्याची शक्यता आहे. मात्र, अंतर्गत स्वच्छता, नीटनेटकेपणा, अतिथीकक्ष, मुद्देमाल या बाबी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. त्यामुळे “स्वच्छ पोलीस ठाणे’ चषकाचा मानकरी कोण ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
निकष व गुण
पाणी व स्वच्छतागृह स्वच्छता – 10 गुण
लॉकअप स्वच्छता – 10 गुण
स्वागत आणि अतिथी कक्ष – 10 गुण
मुद्देमाल कक्ष – 10 गुण
पोलीस ठाणे -10 गुण
अभिलेख व गुन्ह्यांचे रेकॉर्ड – 10 गुण