पालकमंत्र्यांची एकतर्फी निवडणूक व्यवस्थापन समिती बरखास्त

लवकरच सुधारित समिती होणार जाहीर : अपूर्ण समितीच झाली जाहीर : पेशकार

नगर: नगर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार व अन्य नियोजनासाठी भाजपने केलेली व्यवस्थापन समिती वादग्रस्त ठरल्याने ही समिती आता बरखास्त करण्यात आली असून येत्या दोन दिवसात नव्याने सुधारीत समिती स्थापन केली जाणार आहे.पालकमंत्री प्रा.राम शिंदे हे या समितीचे प्रमुख असून गेल्या सोमवारी ही समिती जाहीर करण्यात आली होती. सर्वसमावेश तसेच तालुकानिहाय प्रतिनिधीत्व या समिती नसल्याने अनेकांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे ही समिती गुंडाळण्यात आली असून सुधारीत समिती करण्यात येणार आहेत. दरम्यान, वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली समितीही अपूर्ण आहे. ती पूर्ण करून जाहीर केली जाणार असल्याचे लोकसभा निवडणुकीचे प्रभारी प्रदीप पेशकार यांनी दैनिक प्रभात शी बोलतांना स्पष्ट केले.

सोमवारी पालकमंत्री प्रमुख असलेली लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली होती. या समितीमध्ये प्रामुख्याने पालकमंत्र्यांच्या समर्थकांची वर्णी लावण्यात आली होती. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांचा समावेश याव समितीमध्ये करण्यात आला होता. पक्षाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या गटाला बाजूला ठेवण्यात आले होते. 30 जणांच्या या समितीमध्ये अवघा एका गांधी समर्थकाचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे ही समिती वादग्रस्त ठरली होती.

पक्षाचे विद्यमान खासदार गांधी यांना यंदा उमेदवारी नाकारून डॉ. सुजय विखे यांना देण्यात आली आहे. यामुळे गांधी नाराज असले तरी पक्षाच्या प्रचाराचे काम करणार असल्याचे प्रत्येक व्यासपीठावरून सांगत आहेत, पण दुसरीकडे त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी मात्र अपक्ष उमेदवारी करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपने नगर लोकसभा मतदारसंघासाठी केलेल्या व्यवस्थापन समितीत गांधींना स्थान दिलेले नाही, शिवाय त्यांच्या समर्थकांपैकीही अवघ्या एकाला घेतल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. अर्थात दक्षिण नगर जिल्ह्यातील पक्षाचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले व शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनाही या व्यवस्थापन समितीत स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, त्यांच्या समर्थकांना घेण्यात आले आहे. लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्‍यांना प्रतिनिधीत्व या समितीमध्ये असावे, असा आग्रह होता. परंतू तसे झाले नाही.

भाजपने नगर मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची आधीच नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जोडीला माजी शहर जिल्हाध्यक्ष ऍड. अभय आगरकर यांना निवडणूक सहप्रमुख करण्यात आले आहे. या दोघांव्यतिरिक्त असलेले अन्य सदस्यांमध्ये लोकसभा प्रभारी- प्रदीप पेशकार, लोकसभा संयोजक- प्रसाद ढोकरीकर, सह संयोजक-अरुण मुंडे, जाहीरनामा-सूर्यकांत मोरे, हिशेब- अरुण अनासपुरे, प्रिंट व इलेक्‍ट्रॉनिक्‍स मिडिया-निशांत दातीर, सोशल मिडिया-गणेश भालसिंग, माहिती (आयटी)- रमेश पिंपळे, कार्यालय प्रमुख- भय्या गंधे, प्रचार प्रमुख-नामदेव राऊत, दौरा प्रमुख- श्‍याम पिंपळे, सह प्रमुख-सुभाष दुधाडे, हवाई-रेल्वे-रस्ते- बाळासाहेब नरसाळे, जाहीरसभा प्रमुख-बापू बाचकर, सहप्रमुख – रोहन मांडे, आचारसंहिता प्रमुख (लिगल)-ऍड. युवराज पोटे, निवडणूक आयोग-संपत नलावडे, शिष्टाचार व स्वागत समिती-उदय अनभुले, विविध परवानग्या प्रमुख- दिलीप भालसिंग, सहप्रमुख-अनिल कासार, साहित्य निर्माण प्रमुख-जगन्नाथ निंबाळकर, साहित्य वाटप प्रमुख- मुबारक सय्यद, मतदार सूची प्रमुख-अंबादास शेळके, मतदार बुथ सूची प्रमुख-महारुद्र महारनवर, लाभार्थी प्रमुख-डॉ. मृत्युंजय गर्जे, सहप्रमुख-अमर कळमकर, परिवार क्षेत्र समन्वयक-डॉ. विक्रम भोसले व युती समन्वयक-सचिन पारखी.

या समितीमधील सदस्य निवडीला आक्षेप होता. परंतू पेशकार यांनी मात्र ही वस्तूस्थिती नसल्याचे म्हटले आहे. प्रदेशकडून ही समिती निश्‍चित होणार आहे. प्रदेशकडे नावे पाठविले नव्हते. नजरचुकीने अपूर्ण यादीच वृत्तपत्रांकडे प्रसिद्धीसाठी देण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियेपूर्वी आणि आता समिकरणे बदलली आहे. त्याचा विचार होणे आवश्‍यक आहे. आमदारांचा या समितीमध्ये सहभाग महत्वाचा होता. अपूर्ण यादी जाहीर झाली आहे. अर्थात हेतूपुरस्कर ही यादी जाहीर झालेली नाही. पण त्यात आता सुधारणार करून लवकरच सुधारीत यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे पेशकार यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.