लोणावळा – केवळ हॉटेलवाल्याला त्रास देण्यासाठी म्हणून दारूच्या नशेत 100 नंबरवर फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देणाऱ्याच्या विरोधात लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अविनाश आप्पा वाघमारे (वय 36 वर्ष, रा. रमाबाई आंबेडकर नगर, वसंतराव नाईक मार्ग, साठे चाळ, घाटकोपर ईस्ट, मुंबई 400075) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 2 ऑक्टोबर रोजी रात्री 2.48 वाजण्याच्या सुमारास आरोपी अविनाशने दारूच्या नशेत असताना लोणावळा शहरातील साईकृपा हॉटेल येथे गेला आणि पाण्याची बाटली मागितली. त्याठिकाणी हॉटेलचे मॅनेजर किशोर पाटील यांनी पाण्याचे बाटलीची किंमत जास्त लावल्याचा राग मनात धरून अविनाशने हॉटेल मॅनेजर व कर्मचारी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने विनाकारण आपल्या मोबाईलवरून 100 नंबरवर फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा कट चालू आहे, अशी खोटी माहिती दिली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अक्षय प्रकाश वायदंडे (नेमणूक लोणावळा शहर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण) यांनी फिर्याद दिली असून अविनाश वाघमारे याच्या विरोधात भादवि कलम 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नी. बावकर हे करीत आहेत.