संगमनेर: टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यास कोयता काढून धमकावल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर राजेंद्र ठाकूर (रा. चाकण, जि. पुणे) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर संगमनेरहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या वाहनचालकाकडे (क्र. एमएच- 14 एफटी- 2006) कर्मचारी किरण गोरक्षनाथ पावसे याने टोलचे पैसे मागीतले. त्याचा राग आल्याने चालकाशेजारी बसलेल्या सागर ठाकूर याने पैसे भरणार नाही, असे सांगत वाहनातील कोयता काढून कर्मचाऱ्याला धमकावले. त्यामुळे यासंदर्भात किरण पावसे याच्या तक्रारीवरुन तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ठाकूर याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर तोरकडी पुढील तपास करत आहेत.