जगातील अधिकृत सात आश्चर्यांव्यतिरिक्त असंख्य आश्चर्यकारक गोष्टी आहेत. ‘हे कसं शक्य आहे,’ असा प्रश्न डोळ्यात घेऊन या गोष्टी पाहताना तोंडात बोटं घालावी लागतात. मग अशा आश्चर्यकारक गोष्टींच्या बाबतीत वेगवेगळी कथानकं तयार होतात. बहुतेक वेळा ती ‘चमत्कार’ याच सदरात मोडणारी असतात. त्यामुळे गूढ दुप्पट वाढतं. एकतर आपण जे पाहतो आहोत, त्यावर विश्वास बसत नाही आणि त्याविषयी सांगितलेली कथानकंही मनाला पटत नाहीत.
गूढ कायमच राहतं. अशा आश्चर्यकारक बाबींपैकी एक म्हणजे फ्रान्समधील ‘डुरंडल’ तलवार. ‘फ्रेंच एक्सकॅलिबर’ या नावानेही ती ओळखली जाते. या तलवारीचं गूढ म्हणजे ती दगडात रूतून बसलेली आहे. रोकोमॅडॉर या ऐतिहासिक शहरात एका दगडी भिंतीत शंभर फूट उंचीवर ती दगडात रूतलेली आहे. सुमारे 1300 वर्षांपूर्वी ती तिथं रूतलेली असावी, असं इतिहासकार सांगतात. फ्रेंच लोकांचा स्वाभिमान या तलवारीशी जोडला गेला आहे.
या तलवारीविषयी जी कहाणी सांगितली जाते, ती अधिक गूढ आहे. या कहाणीनुसार, आठव्या शतकात रोमन सम्राट शार्लेमेन याला ही तलवार भेट देण्यासाठी खुद्द एक देवदूत आला होता. सम्राटाने त्याच्या सैन्यातील सर्वोत्कृष्ट योद्धा असणार्या रोलांड याला ही तलवार देऊन टाकली. काही इतिहासकारांच्या मते रोलांड हा सम्राट शार्लेमेनचा पुतण्या होता. परंतु एक चमत्कृतीपूर्ण तलवार एका असीम योद्ध्याच्या हातात येण्यामागची हीच ज्ञात कहाणी. ‘डुरंडल’ तलवार एवढी मजबूत आणि धारदार होती, की तिच्या एका घावात मोठ्या दगडाचे दोन तुकडे करता येत असत, ही या तलवारीला चिकटलेली आणखी एक कहाणी.
त्याचं कारण सांगताना ती दैवी तलवार होती, याकडे लक्ष वेधलं जातं. सेंट पीटर या धर्मगुरूचे दात आणि सेंट बेसिल या धर्मगुरूचं रक्त या तलवारीच्या निर्मितीप्रक्रियेत वापरलं गेलं होतं, असंही सांगतात. भिंतीवर शंभर फूट उंच ही तलवार दगडात कशी रुतून बसली, यामागे दोन कहाण्या सांगितल्या जातात. एक म्हणजे डुरंडल तलवार घेऊन रोलांड लढत होता; परंतु शत्रूंची संख्या एक लाख असल्यामुळे आपला निभाव लागणार नाही, हे रोलांडला कळून चुकलं. आपल्या मृत्यूनंतर ही जादुई तलवार शत्रूच्या हाती लागू नये, म्हणून त्याने ती दगडावर जोरात आपटून नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्याचा उपयोग झाला नाही. मग त्याने डुरंडल तलवार रणांगणातून उंच फेकली आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करून ती या भिंतीत येऊन रुतली. आणखी एका कहाणीनुसार, रोलांडने मरताना ती स्वतःच्या शरीराखाली लपवण्याचा प्रयत्न केला होता.या कहाण्या आजमितीस पटणार्या नाहीत हे खरं; पण त्याहून न पटणारी घटना म्हणजे 1300 वर्षे दगडात रुतून बसलेली तलवार अचानक गायब होणं. शेकडो पर्यटक रोज ही तलवार पाहायला येतात. दगडातून ती बाहेर येणं अशक्यच; पण तरीही सुरक्षिततेसाठी ती साखळीने बांधून ठेवली होती. अशा परिस्थितीत ती कुणी आणि कशी चोरून नेली, हे गूढ फ्रेंच नागरिकांना खायला उठलंय. तलवार दगडात रुतून बसणं जितकं अगम्य, त्याहून अगम्य ती दगडातून काढून चोरून नेणं..!