संगमनेर: संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द गावच्या शिवारात एका अज्ञात तरुणाचा खून करून मृतदेह दगडाच्या खाणीत टाकण्यात आल्याची घटना बुधवारी (1 मे) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास वडझरी खुर्द शिवारातील किसन काळू थोरात यांच्या शेतातील दगड खाणीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. यात मयत व्यक्तीच्या डोक्याला जबर मारहाण करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला दगडाच्या खाणीत टाकण्यात आल्याची शंका पोलिसांकडून उपस्थित केली जात आहे.
वडझरी खुर्दचे पोलीस पाटील सुपेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.प्रकरणाचा पुढील तपास पो.नि.सुनील पाटील करीत आहे. दरम्यान खुनाचा प्रकार ऐकताच वडझरी खुर्द गावात एकच खळबळ उडाली आहे. खून नेमका कोणाचा झाला? कसा झाला? अशी सर्व चर्चा गावात रंगू लागली.