सातारा (प्रतिनिधी) – येथील राधिका चौकात एका युवकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीतील आकाश संदीप साबळे (रा. शिवथर ता. सातारा) या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील राधिका चौकात 21 मार्च रोजी एका युवकाला पाच जणांच्या टोळीने मारहाण करून लुटले होते. त्यावेळी संशयितांनी युवकाचा मोबाइल व रोख रक्कम लंपास केली होती. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तेव्हापासून पाचही संशयित फरारी होते. त्यातील आकाश साबळे याला स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी दुपारी बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अटक केली. साबळे हा मित्राला भेटायला आल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्योतिराम बर्गे, हवालदार तानाजी माने, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, विशाल पवार, गणेश कचरे यांनी ही कारवाई केली.