सप्टेंबर महिन्यात गणपती बाप्पांना भेटायला येणारे एक फूल म्हणजे गणेशपुष्प. कधी काळी ही वेल अमेरिकेतून इथं आली आणि इथलीच झाली. ही वळसे घालत चढते. पाने पिच्छाकृती (पिसासारखी) संयुक्तपर्ण प्रकारची, पाच ते आठ सेंमी लांबीची असून अतिशय नाजूक व सुंदर दिसतात. सुमारे पंचवीस, केसासारख्या, पण चपट्या, अरुंद हिरव्यागार पर्णिका हे गणेशवेलाचे वैशिष्ट्य आहे.
फुले लहान, दोन-तीन सेंटीमीटर व्यासाची, आकर्षक लालभडक रंगाची, अतिशय नाजूक असतात. फुलांत समान आकाराच्या पाच पाकळ्या काहीशा टोकदार असतात. त्यामुळे त्यांना साधारण चांदणीसारखा आकार प्राप्त होतो. पाकळ्या एकमेकांना जोडल्या जाऊन फुलाच्या तळाशी त्यांची एक नलिका तयार झालेली असते. मोठी उद्याने, घरगुती बागा, तसेच कुंडीतही गणेशवेल लावलेला आणि छान वाढलेला दिसतो.
भरपूर गवत माजल्यामुळे गवत खाणारे सगळेच प्राणी सप्टेंबरात खूश असतात. ओला चारा, बैल मातले! ‘भादव्यात भट्ट आणि अश्विनात तट्टू’ अशी एक म्हण आहे. भादवा म्हणजे भाद्रपद आणि तट्टू म्हणजे लहान चणीचा घोडा. भाद्रपद महिन्यात श्राद्धाची जेवणे करून भटजीबोवा मंडळी पुष्ट बनतात आणि अश्विन महिन्यात हिरवे गवत खाऊन घोडी पुष्ट बनतात. या महिन्यात जनावरांना खाण्यासाठी बंधन नसते, काटकसर नसते!
कारळ्याच्या फुलांचा पुसटसा उल्लेख आपण पूर्वी कधी तरी केला. दिसायला फार सुंदर फूल असते ते आणि समूहाने तर ती फारच सुंदर दिसतात. याची कांडे सूर्यफुलासारखी असतात आणि पानांची ठेवणही तशीच असते. याची फुले बिंबकिरणवंत असतात. म्हणजे असे की, त्यात बिंबपुष्पके आणि किरणपुष्पके अशा दोनही प्रकारची पुष्पके असतात. कारळ्याची चटणी करणे फार अवघड कर्म आहे. बाजारात आयती मिळते ती फार करपलेली आणि तपकिरी झालेली असते. बिनतिखटाच्या कारळ्याच्या चटणीला एक खास रंग असतो.
बागेत शोभेसाठी लावलेली नागदवणा ही वनस्पती अनेकांनी पाहिली आहे. पण हिला नागदवणा म्हणतात, हे कदाचित माहीत नसेल. तिची पाने वैशिष्ट्यपूर्ण असतात. पाने मूलज म्हणजे मुळातून आल्यासारखी, वीस-तीस, हिरवी, लांबट व पातळ असतात. फुलोरा चवरीसारखा असून जाड दांड्यावर आलेला या महिन्यात हमखास दिसतो. त्यावर 15-20 सच्छर म्हणजे तळाशी पानासारखी उपांगे असलेली सुगंधी, पांढरी फुले येतात. नागदवण्याचे शास्त्रीय नाव कायमन एशियाटिकम असून कुमूर (पॅक्रॅशियम ट्रायफ्लोरम) ही त्याच वंशातली, नागदवण्याशी खूप साम्य असणारी जातीही बागेत सहज पाहायला मिळेल. नासपती किंवा पेअर नावाचे फळ आपल्याकडे बाजारात विकायला येऊ लागले आहे.
पावसाळ्याचा बराच पाऊस झाला आहे. चिंब भिजल्या पावसातच हरतालिका, गणेश चतुर्थी आणि ऋषिपंचमी झाली. मराठवाड्यात गौरी-गणपती म्हणत नाहीत, तर महालक्ष्मीचा तीनदिवसीय सण असतो. मस्त खाण्या-पिण्याचे हे दिवस. घाणेरी हे माझे अत्यंत आवडते झुडूप आहे. तिची-माझी मैत्री चाळीस वर्षांची जुनी आहे. माझ्या कॉलेजमध्ये अगदी दर्शनी भागाला हौदाभोवती तिचे कुंपण आहे. त्या हौदावर बसून घाणेरीशी मी खूप गप्पा मारल्या आहेत. तिच्यावर बसणारी फुलपाखरं न्याहाळीत तास न् तास बसलो आहे. तिची पानं चुरगाळून येणार्या गंधाला कुणी उग्र म्हणत असले, तरी मला तो सुगंधच वाटलेला आहे. तिचे पंचांगच मुळी मला आवडलेले आहे. काय करू माझ्या आवडीला?
ही वनस्पती अमेरिकेतून 1824 मध्ये श्रीलंकेत आली. शोभेकरता म्हणून आणलेल्या तिचा आपल्या देशात प्रचंड प्रसार झाला आहे. हे झाड एवढे झपाट्याने वाढते की, त्याला कायम खच्चीकरण करत नियंत्रणात ठेवावे लागते. याच कारणाने कुंपणासाठी म्हणून ते उपयुक्त आहे. रंग बदलणारे असे ते असल्याने त्याच्या फुलांचा मुळी कंटाळा येत नाही. त्या रंगात पुन्हा रंगीबेरंगी फुलपाखरांची भर! वाहवा! घाणेरीला आणखी एक मराठी नाव डॉ. म. वि. आपटे यांनी ‘टणटणी’ असे दिले आहे.