पत्नीबद्दल अश्‍लिल बोलला म्हणून एकाचा खून

घोडेगाव पोलिसांनी केली दोघांना अटक

मंचर- पत्नीबद्दल अश्‍लिल व अपशब्द वापरल्याचा राग मनात धरुन एका व्यक्‍तीचा रॉड व दगडाने जबर मारहाण करुन खून केल्याप्रकरणी घोडेगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणी दोन आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव बाळासाहेब बांगर (रा. मेदनकरवाडी, चाकण, मूळ गाव केज, जि. बीड) व शुभम शंकरराव नामदिवे (वय 23, रा. बंगलावस्ती मेदनकरवाडी, चाकण, मूळ रा. वाडेगाव वरुड, जि. अमरावती) आहे. तर योगेश दहिवडे (रा. चाकण, मूळ रा. नागपूर) व अमोल जाधव (रा. चाकण, मूळ रा. नाशिक) हे फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 10) तळेघर गावाजवळील तिटकारेवस्ती येथील रानात सुमारे पन्नास ते साठ फूट खोल अंतरावर एक अनोळखी मृतदेह असल्याची खबर पोलीस पाटील सतीश भोते यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. डोक्‍यावर धारदार हत्याराने वार करुन मारले होते. तसेच ओळख पटू नये म्हणून फरफटत खोल दरीत मृतदेह टाकून दिला होता. पोलिसांनी मृतदेहाची सखोल पाहणी केली. मात्र, कोणताही पुरावा मिळाला नाही. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी सोशल मीडिया, वृत्तपत्राच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.

त्यानुसार शनिवारी (दि. 12) चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रविण इंगळे यांनी घोडेगाव पोलिसांना फोन करुन सदर मयत व्यक्तीच्या वर्णनानुसार संतोष नामदेव व्हरकटे याचा मृतदेह असून, येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी कटरचे काम करीत असल्याचे सांगितले. तसेच संतोष व्हरकटे के नाणेकरवाडी येथे राहणारे असून ते मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्‍यातील चिंचोली काळजाते येथील असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर चौकशीमध्ये मयत व्यक्ती संतोष व्हरकटेच असल्याचे निष्पन्न झाले.

मयताची ओळख पटल्यानंतर अधिक चौकशी केली असता व्हरकटेचा मोबाइल बाळासाहेब बळीराम बांगर (मूळ गाव केज, जि. बीड) यांच्याकडे असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी बांगर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता व्हरकटे यांच्यासोबत चाकण ग्रामीण रुग्णालयात बांगर हे कटरचे काम करीत होते. व्हरकटे यांना दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत बांगर यांच्या पत्नीबद्दल अश्‍लील भाषेत ते बोलत असे. तसेच कटरच्या कामावरुन वाद होत होते. त्या कारणावरुन चिडून जाऊन व्हरकटे यांच्या डोक्‍यात रॉडने व दगडाने जबर मारहाण करुन खून केल्याची त्याने कबुली दिली.

त्यानंतर व्हरकटे यांचा मृतदेह प्लॅस्टिकच्या कागदात व गाडीच्या कव्हरमध्ये बांधून तो एका काळया रंगाच्या चारचाकी गाडीच्या डिकीत टाकला. यासाठी शुभम शंकरराव नामदिवे, योगेश दहिवडे व अमोल जाधव यांनी मदत केली. यावरुन बाळासाहेब बांगर व शुभम नागदिवे यांना रविवारी (दि. 13) घोडेगाव पोलिसांनी अटक केली आहे. तर योगेश दहिवडे व अमोल जाधव हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

या प्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, सहायक फौजदार युवराज भोजने, पोलीस हवालदार शंकर तळपे, दिलीप वाघोले, काशिनाथ गरुड, देवराम धादवड, दीपक काशिद, संदीप लांडे, अमोल काळे, अतिश काळे, अविनाश कालेकर, शरद कुलवडे, राजेश तांबे यांनी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)