कॉंग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी : ना. थोरात

संगमनेर  -करोना विषाणूचे संकट गंभीर असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व ती मदत करण्याची आवश्‍यकता आहे. या कठीण प्रसंगी सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी कॉंग्रेसने विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच लोकसभा व राज्य सभेच्या खासदारांचे एक महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

करोनाचे संकट जगभर गंभीर झाले असून देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सरकारी पातळीवरून सर्व प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्र सरकारचे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे काम कौतुकास्पद आहे. या कामात अनेक सामाजिक संस्था, उद्योगपती, तसेच व्यक्तीगत पातळीवरूनही सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी हजारो हात पुढे आले आहेत. कॉंग्रेसने श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशहिताला व नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

करोनाच्या संकट काळात सर्व आमदार व खासदारांनी एक महिन्याचे वेतन मदत निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत जमा करण्याची इच्छा आहे त्यांनी, महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या स्वतंत्र बॅंक खात्यात आपली मदत जमा करावी, असे आवाहन ना. थोरात यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.